मालवणी येथील दारूकांडात  ८४ जणांचा बळी गेल्यानंतर आता राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. अवैध दारू विक्री आणि गावठी दारू बनवणाऱ्यांविरोधात ठिकठिकाणी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठवडाभरात गावठी दारू विक्रेते आणि हातभट्टय़ांविरोधात विशेष मोहीम असून या कारवाईत २८ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यात ४ लाख ५८ हजार ३०२ रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्य़ाला खोपडी दारूकांड आणि स्पिरीटकांड यांचा इतिहास लाभला आहे. युती सरकारच्या काळात खोपोलीजवळ झालेले खोपडीकांड असो अथवा आघाडी सरकारच्या काळात पाली परिसरातील स्पिरीटकांड या दोन्ही दारूकांडात जवळपास १००९ हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यात आदिवासी समाजाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गावठी दारूची निर्मिती आणि वाहतूक रोखणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगडच्या उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे.
या भरारी पथकांना दर महिन्यासाठी विशिष्ट लक्ष्यांक दिला जातो आहे. गुन्हे दाखल करताना वारस गुन्हे दाखल करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचे चांगले परिणाम आता दिसण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्य़ात अवैध दारू विक्री रोखणे हे उत्पादन शुल्क विभागाचे उद्दिष्ट आहे. यातूनच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही ही कारवाई करण्यात भरारी पथकांना यश आले आहे. अजूनही आíथक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक आहे. या काळात जास्तीत जास्त कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक निलेश सांगडे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्य़ातील अवैध दारू विक्रीचा इतिहास लक्षात घेऊन, आता उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात धडक कारवाईला सुरवात केली आहे. गेल्या आठवडाभरात म्हणजे १५ जून ते २० जून या कालावधीत भरारी पथकांनी ठिकठिकाणी धाडी टाकल्या. यात २८ गुन्ह्य़ांची नोंद केली आहे. यात ४ वारस तर २४ बेवारस गुन्ह्य़ांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दारू तयार करण्यासाठी लागणारा गुळ, रसायन, तसेच तयार दारू, त्यासाठी वापरली जाणारी भांडी, ड्रम, बॅरल ५०० लिटर क्षमतेचे ४ बॉयलर, २० लिटर क्षमतेचे १९ कॅन, िपप आदी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. याखेरीज गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या ४२ बाटल्या उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केल्या असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली.
मात्र आजही रायगड जिल्ह्य़ातील काही भागात हातभट्टी आणि गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री राजरोसपणे केले जाते आहे. अलिबाग तालुक्यातील सुडकोली, कावाडे यासारखी गाव ही गावठी दारू निर्मितीची केंद्रे बनली आहेत. या गावात यापूर्वी अनेक वेळा अवैध दारूधंद्याविरोधात तक्रारी समोर आल्या आहेत. रायगड जिल्ह्य़ाचे पोलीस दल आणि उत्पादन शुल्क विभाग दोघांनाही याची जाणीव आहे. मात्र दोन्ही विभागात समन्वय नसल्याने अवैध दारू विक्री करणारे आणि दारू निर्मिती करणारे यांच्या विरोधात व्यापक कारवाई होताना दिसून येत नाही. मालवणी येथील दारूकांडानंतर या परिसरातील ८ पोलिसांचे निलंबन करण्यात आले, तर उत्पादन शुल्क विभागाच्या चार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. यातून दोन्ही विभागाने बोध घेणे गरजेचे आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवैध दारूविरोधात कारवाई करणे हे पोलिसांचे काम नाही, त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे, अशी भूमिका पोलिसांकडून घेतली जात असल्याचे दिसून आले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाईसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे आणि कारवाईत पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याच्या सबबी समोर येत आहेत. त्यामुळे दोन्ही विभागात समन्वय निर्माण करून या विरोधात व्यापक मोहीम राबविणे गरजेचे आहे.