News Flash

करोनाबळी वाढले असताना मंत्र्यांचे हेलिकॉप्टरमधून शोभेचे दौरे

माजी मंत्री विखे यांचा महसूलमंत्री थोरातांवर हल्लाबोल नगर : जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. मात्र पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील कोणताही मंत्री नगरमध्ये तळ

माजी मंत्री विखे यांचा महसूलमंत्री थोरातांवर हल्लाबोल

नगर : जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. मात्र पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील कोणताही मंत्री नगरमध्ये तळ ठोकून बसला व त्याने नियोजनासाठी पुढाकार घेतला असे घडले नाही. जनता जमिनीवर बेहाल झालेली असताना जिल्ह्यातील मंत्री मात्र हेलिकॉप्टरमधून फिरत आहेत. पालकमंत्री कोल्हापूरमधील  ‘गोकुळ’च्या निवडणुकीत व्यस्त आहेत, दुसऱ्या एका मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र ज्यांच्याकडे पालकमंत्री पद नाही, असे राज्याचे म्हणवणारे काँग्रेसचे नेते प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा नियोजनासाठी पुढाकार का घेत नाहीत, जिल्ह्याच्या मुख्यालयात ठाण मांडून का बसत नाहीत, जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून देण्यासारखी परिस्थिती आहे, असा जोरदार हल्ला भाजप नेते, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

माजी मंत्री आमदार विखे आज, शुक्रवारी नगरमध्ये होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता, त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आमदार विखे पुढे म्हणाले, राज्यात जसा महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये समन्वय दिसत नाही तसाच जिल्ह्यातील चारही मंत्र्यांमध्ये समन्वयाचे अभाव आहे. जिल्ह्यात लोकांचे बळी जात असताना त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे.

जिल्ह्यातील मंत्र्यांनी तळ ठोकून नियोजन करण्याची आवश्यकता असताना मंत्र्यांचे दौरे केवळ शोभेच्या वस्तूंसारखे होत आहेत, मात्र प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठ्याअभावी जनतेचा जीव जातो आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात सीबीआय, एनआयए या यंत्रणाच्या तपासात लवकरच बडे मासे, मंत्री अडकू शकतात, राज्य सरकारची ही बेअब्रू झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यातून सरकारमधला सावळा गोंधळ उघड होत आहे, अशी टीकाही आ. विखे यांनी केली.

‘राज्य सरकार केंद्राला बदनाम करत आहे’

राज्यात आरोग्य सुविधांच्या नियोजनाअभावी करोनामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रसाठी महाविकास आघाडी शाप ठरत आहे. नागरिकांच्या बळींची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी. राज्यात आपत्ती व्यवस्थापन पूर्ण कोलमडले आहे. राज्यात तातडीने उपाययोजना करण्याऐवजी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत प्राणवायू देत नाही, रेमडेसिविर इंजेक्शन देत नाही, असे सांगत राजकारण करत आहे. केंद्र सरकारला बदनाम करत आहे. राज्य सरकारच्या या राजकारणातच लोकांचा जीव जातो आहे, असा आरोप विखे यांनी केला.

जिल्हा प्रशासनाला राजकीय पाठबळ नाही

अशा बिकट आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने मंत्र्यांची बटिक म्हणून काम करण्याऐवजी ‘अ‍ॅक्?शन मोड’मध्ये जावे. मंत्र्यांना वेळ नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लोकांमध्ये जाऊन, धाडस दाखवून निर्णय घेण्याची व काम करण्याची जबाबदारी स्वीकारावी. परंतु जिल्हा प्रशासनाच्या मागे राजकीय इच्छाशक्ती ठामपणे उभी राहताना दिसत नाही. त्यामुळे आपण जिल्हा प्रशासनाला दोष देणार नाही, असेही आ. विखे म्हणाले.

मंत्र्यांची  परस्परविरोधी विधाने

राज्यात महाविकास आघाडी नव्हे तर ‘महाभकास आघाडी सरकार’ आहे. तीन पक्षांचे मंत्री परस्परविरोधी विधाने करत आहेत. एक मंत्री म्हणतो, कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. दुसरा म्हणतो, कठोर निर्णयांची आवश्यकता नाही तर तिसऱ्या मंत्र्याला काय निर्णय होणार आहेत याचीच माहितीच नसते, असा टोलाही आमदार विखे यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 1:13 am

Web Title: corona death patient minister tour by helicopter akp 94
Next Stories
1 भाजप राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून दिलीप गांधी कुटुंबीयांचे सांत्वन
2 रुग्णवाहिका चालकांनी अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास कारवाई
3 पारनेरमधील नोंद नसलेल्या बाधितांची वाढ
Just Now!
X