|| निखिल मेस्त्री

मृत्युशय्येनंतरही यातना; अंत्यविधीसाठी अनेक अडचणी

पालघर: करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना मृत्युशय्येनंतरही अनेक यातना भोगाव्या लागत आहेत. पालघर पूर्व शहरातील स्मशानभूमीतील अग्निदाहासाठी असलेल्या लोखंडी शवदाहिन्यांची दुरवस्था झाल्यामुळे या मृतांसह इतर मृतांनाही अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. येथे असलेल्या पालघर नगर परिषद कर्मचाऱ्यांना हे अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पालघर तालुक्यात करोनाबाधित रुग्णसंख्येबरोबर मृतांची संख्याही लक्षणीय आहे. दररोज दोन ते चार रुग्ण दगावत आहेत. बोईसर, सफाळे परिसर, मनोर परिसर, केळवे परिसर येथील अतिदक्ष रुग्ण ढवळे, ग्रामीण रुग्णालय पालघर येथे उपचार घेत आहेत. गेल्या २२ दिवसांत या दोन व इतर रुग्णालयांत करोनामुळे सुमारे ४० जण दगावले आहेत. दगावलेल्या रुग्णांवर दररोज पालघर पूर्वेकडील स्मशानभूमीत अंत्यविधी केले जात आहेत. यासाठी पालघर नगर परिषदेचे चार कर्मचारी पाळीने दिवसरात्र दाहविधीचे काम पाहत आहेत.

अंत्यविधी करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ते सांगत आहेत. लोखंडी दाहिनी तुटल्याने सरण रचणे, शव जाळणे जिकिरीचे होत असल्याने हे कर्मचारीवर्गही मेटाकुटीला आले आहेत. तुटलेल्या दाहिनींवर दाहविधी करणे जिकिरीचे जात आहे. दाहिनी दुरवस्थेत असल्याने आता फक्त दोन दाहिनींवर अंत्यविधी पार पडावे लागत आहेत. त्याही दररोज शव जाळत असल्याने तावून दुरवस्थेत सापडण्याची वेळ ओढवली आहे. वेळप्रसंगी अंत्यविधीसाठी जास्त शव आले तर इतर दाहिनीवर अंत्यविधी करताना मृतांसह जळते सरण कोसळून पडत आहे. त्यामुळे मृत रुग्णांना पुन्हा सरण रचून पेटवावे लागत आहे.

पालघर शहरात पूर्वेकडील भागातली ही मोठी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत एका वेळेला पाच ते सहा मृतांना अग्नी देणे शक्य आहे. मात्र ज्या शेगड्यांमध्ये मृतांना अग्नी दिला जातो त्या शेगड्याच गेल्या वर्षापासून तुटल्या आहेत. याबाबत येथे अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार नगर परिषद प्रशासनाला सांगूनही नगर परिषद प्रशासन डोळेझाक करीत आहे. याचा वाईट परिणाम कर्मचारी वर्गावर होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. करोनाबाधित मृत रुग्णांसह इतर मृत्यू झालेले शवही या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. मात्र शेगड्या दुरवस्थेअभावी मृतांना व त्यांच्या नातेवाईकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.

नगर परिषद प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांसाठी पीपीई पोशाख आदी बाबी उपलब्ध करून दिल्या असल्या तरी येथे निर्जंतुकीकरणाची व सॅनिटायझरची कोणतीही सोय दिसून येत नाही. कर्मचारी वर्गासाठी दिलेले वैयक्तिक सॅनिटायझर द्यावे लागत आहे. हात धुण्यासाठी साबणाचीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे

इतर साधनांचाही अभाव दिसून येत आहे. स्मशानभूमीतील लोखंडी शेगड्या व इतर साधने पुरविण्याची मागणी होत आहे.

मरणानंतरही यातना सहन कराव्या लागणे दुर्दैवी आहे. नगर परिषदेने तातडीने नव्या दाहिन्या बसवाव्यात. मृतांची हेळसांड होणार नाही याकडे लक्ष द्यावे. – सचिन पाटील, माजी नगरसेवक

 

दाहिन्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. चार-पाच दिवसांत प्रक्रिया पूर्ण होताच नव्या दाहिन्याच्या कामासाठीचे आदेश दिले जातील. – स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद