चंद्रपूर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असतानाच आज (शनिवार)दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात करोनामुळं ४२ वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याातील हा करोनामुळे झालेला पहिलाच मृत्यू आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, शहर पोलीस ठाण्यात करोनाबाधित मिळाल्याने प्रशासन हादरले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी या युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा युवक अमरावती येथे गेला होता. पाच ते सहा दिवसांपासून त्याला त्रास सुरू होता. मूळचा चंद्रपूर येथील रहिवासी असल्यामुळे त्याला येथे आणण्यात आले. रूग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. ३१ जुलै रोजी त्याची करोना चाचणी केल्या गेली. त्यानंतर आज दुपारी त्याचा अहवाल सकारात्मक आला.

दरम्यान, अहवाल येत नाही तोच एक तासानंतर आज दुपारी दीडच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरातील रहमतनगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण ३० जुलैला रात्री साडेअकरा वाजता दाखल झाला होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. बाधिताचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. काही मोजके नातेवाईक पीपीई किट परिधान करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करतील असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात तीन करोनाबाधित मिळाले. त्यामुळे ७० कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवून त्यांची चाचणी केली. त्यांचा अहवाल नकारात्मक आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा परिषदेतील एक तर महानगरपालिका व शहर पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी बाधित निघाला आहे. विविध कार्यालयात करोनाचा प्रवेश होत असल्याने प्रशासन हादरले आहे. १ ऑगस्टपर्यंत ५३६ करोनाबाधित असून त्यांपैकी ३३८ बरे झाले आहेत. तर १९८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी क्वारंटाइन

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तीन कर्मचारी करोनाबाधित मिळाल्याने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. त्यांनी स्वत: लोकसत्ताशी बोलतांना ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील ७० कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी सतर्कता म्हणून क्वारंटाइन केल्याचे सांगितले.