राज्यात करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांना व्यापाऱ्यांचा विरोध असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चर्चा करत त्यांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

चिथावणीला बळी पडू नका!

दरम्यान यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री. व्यास यांनी सांगितलं की, “राज्यात फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर २०२० मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस बारा लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते”.

“राज्यात गंभीर परिस्थिती आहे. विषाणूच्या नवा स्ट्रेनचा फैलाव वेगाने होत असून आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरूण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील,” असं आवाहन टास्क फोर्सचे डॉ. जोशी यांनी यावेळी केलं.

स्त्यावर उतरण्याची भाषा नको
“कामगार- कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या करोना चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घ्या, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले. गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये. करोना पूर्ण जात नाही, तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही, विषाणूशी आहे. कोणी चिथवले म्हणून बळी पडू नका,” असं आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला हाणला.