रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराजवळील भोस्ते येथील एकाच कुटुंबातील ७ संशयितांना करोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जिल्ह्यातील करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळे खबरदारीचे उपाय करीत असूनही हे संशयित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार या कुटुंबातील एकजण काही दिवसांपूर्वी परदेशातून आला. पण त्याने किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ही माहिती आरोग्य विभागाला दिली नाही. पण आजार बळावल्यामुळे त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. या सर्वांना स्वतंत्र कक्षात वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले असून, शासनाच्या निर्देशानुसार उपचार सुरू आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने रात्री उशिरा पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात त्यांचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यावर ते करोनाबाधित आहेत काय, हे स्पष्ट होईल.

या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचीही माहिती घेण्याचे काम प्रशासन करत असून आणखी काही करोना संशयित सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये विलगीकरण करून ठेवलेल्या रुग्णांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५७ जणांना उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

रोजंदारीवरील कामगारांची भोजन-निवास व्यवस्था

जिल्हयात जेएसडब्लू, जयगड पोर्ट तसेच येथील औद्योगिक वसाहतीत असणार्‍या कंपन्यांनी त्यांच्याकडील रोजंदारीवर असणार्‍या कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. सर्व तालुक्यातील अशा कामगारांची संख्या ४७४ असून राहण्याची व भोजनाची व्यवस्था नसलेल्यांची संख्या २१ आहे. खेड येथे निवारा केंद्रात १२ व दापोली येथे ९ जणांची व्यवस्था केली आहे. तपासणीसाठी नमुने पाठवलेल्या सहाजणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, तर ७३५ जणांना घरीच अलगीकरण करून ठेवले आहे.

पत्रकार म्हणून प्रवेशाचा बनाव फसला

रत्नागिरीच्या रहिवासी असलेल्या पाचजणी मुंबईत नोकरीसाठी राहत होत्या. लॉकडाऊनमधून सुटका करून घेत घरी पोचण्यासाठी त्यांनी खासगी चारचाकी गाडीवर ‘प्रेस’ लिहून रत्नागिरीत पोचण्याची योजना आखली. पण शहरात प्रवेश करण्यापूर्वी हातखंबा येथे पोलिसांनी अडवून केलेल्या चौकशीमध्ये त्यांचा बनाव उघडकीस आला. आता खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जणींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.