जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात वन विभागाकडून सुरू असलेल्या कामांच्या तक्रारीत वाढ होत आहे. नियमाप्रमाणे मजूर सोसायटय़ांना १५ लाखांच्या वर काम देता येत नसताना या विभागाने मात्र नियमांची पायमल्ली करून १६ लाखांच्या वर किमतीची कामे दिल्याने जलशिवारच्या कामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जलयुक्त शिवारअंतर्गत जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू आहेत. परंतु वन विभागाकडून सुरू असलेल्या वनतळे, सिमेंटनाला बांध, मातीबांध या कामांच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वन विभागाने अंजनवाडा, दुधाळा, येथे मोठय़ा प्रमाणात कामे सुरू केली. काही ठरावीक गावांतच इतक्या मोठय़ा प्रमाणात कामे कशी, असा सवाल केला जात आहे. पूर्वी अंजनवाडा गावच्या सरपंच संगीता काचगुंडे यांच्यासह ग्रामस्थांनी वनतळय़ाच्या कामांसंबंधी तक्रार केली होती, मात्र प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतली नाही.
सरपंचांनी केलेल्या तक्रारीची चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा वन विभागाने नियमाची पायमल्ली करून सिमेंट नालाबांधची कामे मजूर सोसाटय़ांना दिल्याने सिमेंटनाला बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नियमाप्रमाणे मजूर सोसायटय़ांना १५ लाखांपर्यंतची कामे देता येतात. मात्र, वन विभागाने नियमांची पायमल्ली करून १६ लाखांच्या वर किमतीची कामे मजूर सोसायटय़ांना दिली व ती देत असतानाही कामाच्या फेरनिविदांसाठी ३ दिवसांची मुद्दत असताना दोनच दिवसांची मुद्द दिल्याचा आरोप होत आहे.
दुधाळा येथील दोन, अंजनवाडा येथील एका कामासह सहा कामे मजूर सोसायटीला देताना नियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार आहे. आता कमी दराची निविदा करून काम नियमात बसवण्याचा प्रकारही केला. एका मजूर फेडरेशनच्या सदस्याने तक्रार केली असता ती परत घेण्याचा प्रसंगही मजूर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यावर आल्याची चर्चा आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा शिवारात झालेली कामे अत्यंत निकृष्ट असल्याचे आरोप होत आहेत. या ठिकाणी केलेल्या कामांवर २ कोटी २० लाख रुपयांचा खर्च झाला, तर मातीनाला बांधाच्या कामावर ८ ते ९ लाख रुपये उचलण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. सिमेंटनाला बांधकामाच्या कामावर १६-१७ लाख निधीतून मजूर सोसायटीकडून कामे करून घेतली जात असल्याचा आरोप होत आहे.