07 June 2020

News Flash

जेमतेम उत्पादनामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले!

गेल्या दशकभरात राज्यात बीटी कापसाचे क्षेत्र झपाटय़ाने वाढले.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या अनेक वर्षांपासून इतर राज्यांच्या तुलनेत कमी असलेली उत्पादकता, शेतीचा वाढलेला खर्च, बाजारातील अनिश्चितता यात भरडून निघालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता बोंडअळीने गारद केले असून, यावर्षी उत्पादन जेमतेम असल्याने राज्यातील कापसाचे अर्थकारण कोलमडून गेले आहे.

गेल्या दशकभरात राज्यात बीटी कापसाचे क्षेत्र झपाटय़ाने वाढले. उत्पादकता वाढल्याचे सांगितले गेले, पण राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ या अपवाद वगळता प्रत्येक वर्षांत कापसाची हेक्टरी उत्पादकता ही दीडशे ते तीनशे किलोग्रॅमच्या वर जाऊ शकली नाही. गेल्या वर्षी विक्रमी ४७५ किलोग्रॅम एवढी उत्पादकता नोंदवली गेली. २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन वर्षांमध्ये उत्पादकता १४५ किलो आणि १५८ किलो अशी खालावली होती. राज्यात २००६ पर्यंत शंभर ते दीडशे किलोग्रॅमच्या आसपास असलेली उत्पादकता नंतरच्या वर्षांत बीटी कपाशीमुळे अचानक तीनशे ते चारशे किलोपर्यंत गेल्याचा इतिहास आहे. पण, आता तशी स्थिती नाही. बीटी कपाशीवरील कीडरोगांच्या आक्रमणामुळे सरळ वाणाचे हायब्रीड कपाशीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

यंदा बीटी कपाशी गुलाबी बोंडअळीसमोर प्रभावहीन ठरल्याचे सर्वदूर चित्र आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांना अतिविषारी कीटकनाशकांचा वापर करावा लागला. त्यामुळे तीसहून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले. शेतकऱ्यांच्या या मृत्यूंसाठी बीटी कपाशीचे अपयश जबाबदार असल्याचे आता बोलले जात आहे.

देशात २०१४ पासून गुलाबी बोंडअळीने बीटीसाठी प्रतिकार क्षमता विकसित केल्याचे आयसीएआर आणि सीआयसीआर या दोन्ही संस्थांच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे, पण त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आली नाही, हा खरा आक्षेप आहे. गुलाबी बोंडअळी ही बीटी कपाशीमधील काही विषारी जनुकांना प्रतिकार करीत असल्याचे लक्षात आले होते. गुलाबी बोंडअळीपुढे बीटी कपाशी अपयशी ठरत असल्याचा अहवाल कृषी विभागाने जुलै महिन्यात सरकारला दिला होता, पण तोवर बियाणे खरेदी होऊन गेली होती. सध्याच्या परिस्थितीत कीटकनाशकांच्या वापराला पर्याय नाही, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.

रासायनिक कीडनाशक प्रतिकार शक्ती विकसित होण्याच्या किडीमधील नैसर्गिक गुणधर्मामुळे बीटी कपाशीमध्ये बोंडअळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला. बियाणातील डेल्टा-एन्डोटॉक्सिन यामुळे किडीमध्ये प्रतिकार शक्ती वाढली. राज्यातील कृषी विद्यापीठांत बीटी कपाशीच्या सुधारित वाण निर्मितीसाठी संशोधन करण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी गेल्या वर्षी कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली होती.

बीटी कापूस पिकातील अळीकरिता विषारी असलेल्या डेल्टा-एन्डोटॉक्सिन या प्रथिनामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव बीटी कापसावर ९० ते १०० दिवसांपर्यंत होत नाही. यामुळे बीटी कापूस पीक बोंडअळ्यांसाठी प्रतिकारक आहे. तथापि, काही भागांत कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे स्पष्टीकरण गेल्या वर्षी कृषी विभागाने दिले होते. अळ्यांच्या रासायनिक कीडनाशकांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करण्याच्या गुणधर्मामुळे शेंदरी बोंडअळीमध्ये प्रतिकारक्षमता तयार झाली, असे कृषी विभागाचे म्हणणे होते. पण त्यावर उपाययोजनांची गती मात्र संथ दिसून आली.

नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत कपाशीच्या विविध सरळ वाणामध्ये एक जनुक प्रत्यारोपित करण्यात आला आहे. खरीप २०१६ हंगामामध्ये अशा २१ सरळ वाणांचे प्रक्षेत्र चाचणी प्रयोग देशातील १२ ठिकाणी घेण्यात आले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला एक सरळ वाण राष्ट्रीय पातळीवर चाचणी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच अकोला येथील महाबीज आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करारानुसार फुले श्वेतांबरी या कपाशीच्या नवीन संकरित वाणामध्ये बीजी २ जनुक अंतर्भूत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली होती.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत कपाशीचे संकरित वाण तयार करण्यात येत आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एका संकरित वाणाचे बीजी- २ स्वरूपामध्ये रुपांतरण करण्याचे काम महाबीजसोबत सामंजस्य करारान्वये करण्यात आलेले आहे, असेही सांगण्यात आले होते. पण शेतकऱ्यांपर्यंत अजूनही नवीन तंत्रज्ञान पोहचू शकले नाही. आता शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची आस आहे, पण ते घातक नको, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

  • बीटी हे जनुकीय बदल केलेले बियाणे सर्वप्रथम २००२ मध्ये भारतात आणले गेले. कपाशीवरील सर्वाधिक उपद्रवी समजल्या जाणाऱ्या तीन प्रकारच्या बोंडअळींना प्रतिबंध करण्याची क्षमता यात असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीची काही वष्रे बीटी तंत्रज्ञानाने बोंडअळीला चांगला अटकाव केला होता.
  • इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूटमधील संशोधक डॉ. ध्रुव आणि डॉ. गुजर यांनी २००९ साली गुजरातमध्ये महत्त्वाची नोंद केली होती. यात बोलगार्ड १ या बीटी कॉटनला गुलाबी बोंडअळी प्रतिकार शक्ती दाखवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. हे संशोधन पेस्ट मॅनेजमेंट या जर्नलमध्ये २०११ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते.
  • बीटी कॉटनच्या बियाणांचा खर्च एकरी ३ हजार रुपये आहे. बीटी कॉटनमुळे उत्पादन वाढल्याचे सांगितले जात असले, तरी उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतीत कापसाचा सध्याचा एकरी उत्पादन खर्च १५ ते २० हजार रुपये आहे. काही वर्षांपूर्वी तो ६ ते ७ हजारांच्या जवळपास होता.
  • बीटी कॉटन हे जनुकीय बदल केलेले कापसाचे वाण आहे. मातीमधील बॅसिलस थिरूजिअनसिस जिवाणूतील काही जनुके ही बोंडअळीसाठी विषारी असतात. ही जनुके जेनेटिक तंत्राच्या साहाय्याने कपाशीत सोडले जातात, त्यामुळे कापसाच्या झाडातच बोंडअळीसाठी प्रतिकार क्षमता निर्माण होते.

सरळ वाणाचे बियाणे उपलब्ध व्हावे

गेल्या दोन वर्षांत गुजरात, तेलंगणा, पंजाब आणि महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात बोंडअळी, गुलाबी अळीच्या प्रादुर्भावाने नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत. कृषी विभागाने तक्रारीनंतर राशी कंपनीच्या बीटी बियाणांवर बंदी घातली. पण यावर्षी बोलगार्ड या तंत्रावरही विषाणू निरोधकता आल्याने बीटी पूर्णपणे अयशस्वी होत आहे. केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा आणि सरळ वाणाचे हायब्रीड बियाणे उपलब्ध करून द्यावे.

किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2017 2:28 am

Web Title: cotton farmers issue cotton production
Next Stories
1 ‘एनएसडी’च्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’, कार्यकारी समितीची स्थापना
2 नगरमध्ये ऊस शेतकऱ्यांचे आंदोलन शमले; २,५२५ रूपयांची पहिली उचल
3 गुजरातमध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’ : शरद पवार
Just Now!
X