-संदीप आचार्य

अखेर महाराष्ट्रातील वेगवान लसीकरण आणि लसीकरणाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी महाराष्ट्राला १ कोटी ९२ लाख लस मात्रा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १ कोटी ७० लाख लस मात्रा राज्याला तर २२ लाख लस मात्रा खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत जादा लस पुरवठा केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना पत्र पाठवून आभार मानले आहेत. त्याचबरोबर राज्याची गरज लक्षात घेऊन आणखी एक कोटी लस मात्रा देण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेश व गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला सुरुवातीपासून केंद्राकडून कमी लस पुरवठा होत असून राज्याची लोकसंख्या तसेच करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन किमान तीन कोटी लस मात्रा मिळाव्या अशी मागणी राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे. ऑगस्ट महिन्यात १ कोटी २० लाख लस मात्रा दिल्या जातील असे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते. त्यावेळीही तसेच जुलै महिन्यातही राज्याने केंद्राकडे अडीच कोटी लस मात्रा देण्याची मागणी केली होती. ही मागणी करताना राज्यातील करोना परिस्थिती तसेच लसीकरणाची क्षमता याची पूर्ण माहिती केंद्राकडे देण्यात आली होती. राज्यात सुमारे साडेचार हजार लसीकरण केंद्रे असून त्याच्या माध्यमातून रोज १५ ते २० लाख लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लस मात्रा मिळत नसल्याने अनेकदा निम्मी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात. मात्र गेल्या दहा दिवसांत म्हणजे २१ ऑगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत केंद्राकडून पुरेसा लस पुरवठा झाल्यामुळे दररोज सरासरी साडेनऊ लाख एवढे लसीकरण होत होते.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी महाराष्ट्राला १ कोटी ७० लाख एवढा मोफत लस पुरवठा करण्याचा निर्णय घेतला तर खासगी क्षेत्राला २२ लाख लस पुरवठा केला जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करणारे पत्र अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी २ सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना पाठवले असून त्यात आणखी एक कोटी लस मात्रा देण्याची विनंती केली आहे. त्यापूर्वी डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २० गावे येत असून दररोज किमान तीन गावांमध्ये लसीकरण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे. यासाठी गावातील प्रतिष्ठीत वक्ती, पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच आशांचे सहकार्य घेऊन घरोघरी लसीकरणाची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका व नगरपालिका स्तरावर व्यापक प्रसिद्धी करून लसीकरण सत्रे वाढविण्यास सांगितले आहे. लोकप्रतिनिधी व खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासनाचे महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग, ग्रामीण विकास विभाग, शिक्षण आदी विभागांचे सहकार्य घेऊन लसीकरणाची जास्तीतजास्त शिबीरे घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

करोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांची दुसरी लस मात्रा पूर्ण करण्यावरही आरोग्य विभागाचा भर आहे. आजघडीला राज्यातील ५ कोटी ९० लाख लोकांचे लसीकरण झाले असून यात पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या १ कोटी ५९ लाख एवढी आहे. अजूनही मोठ्या संख्येने आरोग्य सेवक तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांची दुसरी लस मात्रा घेण्याचे शिल्लक आहे. त्यांचेही लसीकरण बाकी असून केंद्राकडून अतिरिक्त कोटी लस मात्रा मिळाल्यास लसीकरणाला आणखी गती देता येईल असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. राज्य सरकारबरोबरच राज्यातील खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यास राज्याला हा पुरवठा होऊ शकतो असेही आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.