महागडय़ा लसी बाहेरून विकत आणण्याची सक्ती

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : जिल्ह्य़ातील करोना उपचार केंद्रामध्ये अतिदक्ष रुग्णांसाठी पुरेशा लशी आणि औषधसाठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी करोनामुळे अतिदक्षता विभागात ठेवलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून या महाग लशी बाहेरून खरेदी करण्यासाठी तगादा लावला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोईसरच्या टिमा रुग्णालयातील हा प्रकार आहे. या शासकीय रुग्णालयामार्फत रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे.

बोईसर येथे टीमा रुग्णालयात करोना रुग्णांच्या उपचारासाठी अद्ययावत प्रशासकीय उपचार केंद्र जिल्हा प्रशासनामार्फत स्थापन करण्यात आले आहे. या रुग्णालयात सामान्य करोना रुग्णांसह अतिदक्ष रुग्णांवरही मोफत उपचार केले जात आहेत. उपचारासाठी पुरेसे मनुष्यबळ, लशी व औषधसाठाही उपलब्ध आहे. अतिदक्ष रुग्णांसाठी येथे रेमडेसिव्हिर आणि इतर लशींचा साठा उपलब्ध असतानाही रुग्णालयात सेवा देत असलेल्या एका खासगी फिजिशियनमार्फत सात अतिदक्ष रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून लाखो रुपयांच्या लशी विकत आणण्यासाठी तगादा लावला गेला. अ‍ॅक्टिमार लशीचा दर सुमारे ४० हजार प्रत्येकी किंवा त्याहून जास्त तर रेमडेसिव्हिर लशीचे दर चार हजारांहून अधिक आहे. एका अतिदक्ष रुग्णाला किमान सहा रेमडेसिव्हिर तर एक ते दोन अ‍ॅक्टिमार लशी उपचारादरम्यान दिल्या जातात. रुग्णांच्या नातेवाईकांनी या लशी हजारो रुपये देऊन विकत आणाव्या लागल्या. परिस्थिती हलाखीची असतानाही पैसे उसने घेऊन या रुग्णांच्या नातेवाईकांनी या लशी एका नोंदणीकृत खासगी औषध विक्रेत्याकडून घेतल्या, तर काहींना येथे उपलब्ध न झाल्याने जिल्ह्याबाहेरून मागवाव्या लागल्या. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक तणावसह आर्थिक नुकसानीला समोर जावे लागले.

परिस्थिती नसतानाही ५० हजाराचे कर्ज घेऊन आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी या लशी बाहेरून विकत घेणे भाग पडले, असे सायकल दुरुस्तीचे दुकान असलेल्या तिच्या मुलाने सांगितले. विशेष म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे पैसे नसल्यामुळे रुग्णालयामार्फत या लशींची व्यवस्था करण्यात यावी, असेही सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही संबंधित डॉक्टरांनी आम्हाला हे इंजेक्शन बाहेरून आणायला लावली, असे एका रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

लशीचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. हा प्रकार गैर व धक्कादायक आहे. तात्काळ संबंधित डॉक्टरकडे याबाबतचा खुलासा मागविला आहे. जिल्ह्यात उपचार केंद्रातून कोणीही बाहेरून लशी आणण्याचा तगादा लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांकडून या लशी मागविल्या गेल्या, त्यांना त्यांचे पैसे परत केले जातील.

– डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक