मराठवाडय़ातील उस्मानाबाद, परभणी व जालना या तीन जिल्हय़ांत गारपिटीमुळे ज्वारीचे मोठे नुकसान झाले. तब्बल ५ लाख ९१ हजार १९२ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी आडवी झाली, काळी पडली. औरंगाबाद व जालना जिल्हय़ांत गहू, मोसंबी, आंबा व डाळिंबाचे मोठे नुकसान झाले.
औरंगाबाद जिल्हय़ात ३४ हजार ५०८ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारीचे नुकसान झाले, तर ८४० हेक्टर ऊस, ३ हजार ८३६ हेक्टर कांदा पिकाचे नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाने दिली. जिल्हय़ात मोसंबीचे नुकसान सर्वाधिक आहे. १० हजार १५ हेक्टर क्षेत्रातील मोसंबी, तर ७ हजार ४७६ हेक्टर डाळिंब पिकाचे नुकसान झाले. अंदाजित आकडेवारीपेक्षा पंचनाम्यानंतर नुकसानीचे आकडे वाढत असले, तरी ते जशास तसे ठेवले जातील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बुधवारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याची आकडेवारी अंदाजित आकडेवारीपेक्षा अधिक असेल तर ‘दक्षता’ घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नुकसानीचे आकडे बदलू शकतील. झालेले नुकसान सरकारी आकडेवारीपेक्षा अधिक आहे.
जालना जिल्हय़ात ९ हजार ८४२ हेक्टर मोसंबीचे नुकसान झाले. ज्वारीचे क्षेत्र ९३ हजार ६१२ हेक्टर असल्याची आकडेवारी देण्यात आली. एकूण १ लाख ४६ हजार १५४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. डाळिंब व मोसंबीला सर्वाधिक फटका बसला. बीड जिल्हय़ात ज्वारी, गहू, भाजीपाला, आंबा, मोसंबी, डाळिंब व द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हय़ांत केशर आंब्याचे नुकसान अधिक आहे. बीडमध्ये १ हजार ६४७, लातूर १ हजार २६८, उस्मानाबाद १ हजार ४९१ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.
भाज्या महागणार
पंचनामे सुरूच असल्याने ही आकडेवारी दररोज बदलत आहे. केलेल्या पंचनाम्यापेक्षा अंदाजित आकडेवारी तुलनेने कमी आहे. अंदाजित आकडेवारीपेक्षा केलेले पंचनामे अधिक आहेत का, हे तपासले जात आहे. मराठवाडय़ात ८ लाख ७३ हजार ८०८ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यात ९ हजार हेक्टरवरून अधिक क्षेत्रावरील भाज्यांचे नुकसान झाल्याने येत्या काही दिवसांत भाज्यांचे दर वाढतील, असा अंदाज आहे.