उपलब्ध माल बुरशीमुळे वाया; मच्छीमार अर्थिक संकटात 

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार :  करोना टाळेबंदी आणि सततच्या हवामानाच्या लहरीपणामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करणारे मच्छीमार पूर्णत: अडचणीत आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या या हंगामाला हवामाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला आहे. यात वसई-विरारमधील प्रत्येकी मच्छीमाराचे दोन ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यामुळे मच्छीमार अधिकच्या आर्थिक संकटात सापडला आहे.

या वर्षी सततची ओढवलेली वादळे, त्यात करोनाची टाळेबंदी आणि आता पावसाचा लहरीपणा यामुळे मासे सुकविण्यासाठी लागणारे ऊन न मिळाल्याने शेकडो मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात टाळेबंदीमुळे मासेमारीवर अनेक निर्बंध आणि नैसर्गिक आपत्तीने वसईतील मच्छीमार बांधव संकटात सापडला आहे. त्यातच प्रशासनाची कोणतीही मदत मिळत नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

ऑक्टोबर महिन्यात चांगल्या प्रमाणत उन्ह पडत असल्याने मासेमारी करून आणलेली मासळी सुकवण्याकडे मच्छीमारांचा कल असतो. त्याप्रमाणे तयारी केली जाते. पण मागील काही दिवसापासून जे नैसर्गिक वातावरण, ढगाळ, रिमझिम पाऊस यामुळे मच्छीमार बांधवाचे मोठे नुकसान झाले आहे. मासेमारी करून आलेल्या बोटीतून महिला २००० ते २२०० रुपये दराने मासळीची पाटी विकत घेतात. ही मासळी महिला निवडून, धुऊन सुकवायला घालतात. पण ही सुकवायला घातलेली मासळी अवकाळी पावसाने वलानीवरच खराब झाली.

सध्या मासळीचा बाजार मंदावला असल्याने सुक्या मासळीला मागणी आहे. पण ज्यांनी आपल्या घरात सुक्या मासळीची साठवणूक केली होती. त्याला दमट आणि आद्र्रतायुक्त वातावरणामुळे बुरशी लागून सर्व माल खराब झाला आहे. यामुळे बाजारात सध्या सुकी मासळी मिळत नाही आहे. जी उपलब्ध आहे तिचे दाम अवाच्या सवा आहेत. यामुळे ग्राहक मिळवणेसुद्धा कठीण झाले आहेत.

अर्नाळा येथील मच्छीमार  यांनी माहिती दिली की, सतत पाऊस पडत असलेयाने आणि ढगाळ वातावरण, सागरी किनाऱ्यावर आद्र्रतायुक्त सुटणारे वारे. आणि उन्हाचा अभाव यामुळे वलानीवर सुकायला घातलेली मासळीला किडे पडून खराब झाली आहे. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.   

जनार्दन मेहेर, मच्छीमार, अर्नाळा

सध्या मासेमारीचा मुख्य हंगाम आहे, या हंगामात मोठय़ा प्रमाणात मासेमारी केली जाते. पण करोनाच्या संकटामुळे मासेमारी पूर्णत: बंद आहे. त्यात आता सुक्या मासळीचा साठासुद्धा तयार करता येत नाही. यामुळे शासनाने मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी. 

रामदास मेहेर, अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छीमार संघटना