संचारबंदी तीन तासांसाठी शिथिल
दंगलीची चौकशी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)मार्फत करावी आणि निकषाप्रमाणे मृतांचे नातेवाईक तसेच जखमींना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या १२ आमदारांनी गुरुवारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. रिपाइंचे माजी खासदार रामदास आठवले यांनीही घटनास्थळी भेट देत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख व जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत करावी, अशी मागणी केली. दरम्यान, दंगलग्रस्त भागातील संचारबंदी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत तीन तासांसाठी शिथिल करण्यात आली होती.
कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आ. दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली उपनेते व माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह १२ आमदारांनी दंगलग्रस्त भागाच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बातचीत केली. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन तातडीची उपाययोजना होऊ शकेल अशी सक्षम यंत्रणा उभी करावी, या मागणीसह दोन्ही समूहातील मने सांधण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या नेत्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री सुरेश शेट्टी यांनी दंगलग्रस्त भागास भेट दिली नसल्याचे या आमदारांनी लक्षात आणून दिले. त्यांनी पक्षामार्फत मदत करण्यापलीकडे प्रशासकीय मदतीसाठीही पुढे यावयास हवे होते, असेही आमदारांनी नमूद केले. आ. प्रा. शरद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी यांसह शिवसेना नेते डॉ. सुभाष भामरे व अन्य आमदार या वेळी उपस्थित होते. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही दंगलग्रस्त भागाचा दौरा केला.