06 March 2021

News Flash

प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या पत्रकारांपासून पत्रकारितेला धोका – गिरीश कुबेर

पत्रकारितेला राजकारण, व्यापारी वा धनदांडगे यांच्यापेक्षा प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या पत्रकारांपासूनच धोका आहे. सत्तेच्या परावर्तित प्रकाशाभोवती आजची पत्रकारिता फिरत असून, हा आपलाच प्रकाश असल्याचे त्यांना वाटते.

| April 29, 2013 02:56 am

पत्रकारितेला राजकारण, व्यापारी वा धनदांडगे यांच्यापेक्षा प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या पत्रकारांपासूनच धोका आहे. सत्तेच्या परावर्तित प्रकाशाभोवती आजची पत्रकारिता फिरत असून, हा आपलाच प्रकाश असल्याचे त्यांना वाटते. यामुळे पत्रकारितेचा जो चौथा स्तंभ आजवर पडद्यामागे अदृश्य स्वरूपात होता, तो आता आपला अलिप्तपणाच गमावतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या १७३ व्या वार्षिक उत्सवांतर्गत शनिवारी बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांना कुबेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
परशुराम साईखेडकर नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ‘पत्रकारितेविषयी बरे बोलावे, असे काही या व्यवसायात राहिलेले नाही. उलट भीती वाटावी,’ अशी स्थिती असल्याचे कुबेर यांनी नमूद केले. वारा ज्या दिशेने वाहतो, त्याच्या विरुद्ध दिशेने खरे तर पत्रकाराने पाहायला हवे; परंतु सध्या वारा ज्या दिशेने वाहतोय त्या दिशेने धावण्यात अनेक जण धन्यता मानत असल्याचे सांगत, त्यांनी अण्णा हजारेंचे आंदोलन व आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे उदाहरण दिले. ‘‘पत्रकारिता हा बुद्धिनिष्ठ व्यवसाय आहे. मात्र तरुण पिढी आकर्षण म्हणून या क्षेत्रात येते. कमी कष्टात पटकन मोठी गोष्ट साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वाचकांशी काही देणेघेणे नाही असे समजून काम केले जाते. आपण कोणासाठी काम करतोय, त्याचे अंतिम ध्येय काय, असे प्रश्नही त्यांना पडत नाहीत. पत्रकारितेत काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पत्रकारिता मनोरंजनाकडे वळत आहे. ज्ञानमार्ग सोडून पत्रकारिता वेगळ्या पद्धतीने जात असून ही बाब धोकादायक आहे. काही जण वाचकांना वाचायला आवडत नसल्याचा सूर आळवतात; परंतु त्यांना वाचायला आवडेल असा ऐवज देण्याची ताकद आपल्यात आहे का, याचे आत्मपरीक्षण केले जात नाही,’’ याबद्दल कुबेर यांनी खंत व्यक्त केली. काही मराठी वर्तमानपत्रांमध्ये सर्रासपणे इंग्रजी शब्द वापरले जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. मराठीत व्यक्त होता येत नाही, अशी तक्रार केली जाते, पण शस्त्र धरणारा अशक्त असेल तर दोष तो शस्त्राचा नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भटेवरा यांनी मनोगत व्यक्त करताना देशाच्या राजधानीत पत्रकारिता करताना आलेले अनुभव कथन केले. बडय़ा राजकीय व्यक्तींभोवती असा काही विळखा पडलेला असतो, की खुद्द नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी ती मंडळी होऊ देत नाहीत. आंतरराष्ट्रीय विषयावर लेखन करताना अभ्यास महत्त्वाचा असतो. पत्रकाराने काम करताना भान ठेवायला हवे. नव्या पिढीत त्याचा अभाव दिसतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 2:56 am

Web Title: danger to journalism by journalist who moves with flow girish kuber
टॅग : Journalism
Next Stories
1 पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
2 आर्थिक अंधार दूर करण्यासाठी धाडसी प्रकल्प साकारण्याची गरज – नितीन गडकरी
3 सभापती संजय जांभळे म्हणतात हा तर युनियनचा स्टंट
Just Now!
X