समाज माध्यमातील ‘टिकटॉक’ वर बंदुक घेऊन संवादफेक करणे शहरातील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मित्राच्या बेपर्वा वृत्तीची दोघा साथीदारांनाही अद्दल घडली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघा मित्रांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन बंदुका आणि तीन काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

दीपक शिरसाठ (रा.भीमनगर, साक्रीरोड) याने हातात गावठी बंदूक घेऊन टिकटॉकवर एक चित्रफित टाकली होती. ही चित्रफित पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या पाहण्यात आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना तपास करण्यास सांगितल्यावर. बुधवंत यांनी तातडीने संशयित दीपकला शोधून काढले. त्याच्याकडून गावठी बंदुक आणि एक काडतूस जप्त केले. पोलिसांनी दीपकला या बंदुकीबद्दल विचारणा केल्यावर त्याने मित्र पंकज जिसेजा (रा. पद्मनाभ नगर, साक्री रोड) याचे नाव सांगितले. पोलिसांनी पंकजलाही ताब्यात घेतले. त्याने अभय अमृतसागर (रा. कुंडाणे) याचे नाव पुढे केले. पोलिसांनी अभयलाही ताब्यात घेतले.

अभयकडून एक गावठी बंदुक आणि दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली. तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ७१ हजार ५०० रूपये आहे. तिघांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे सराईत गुन्हेगार

पोलिसांनी ताब्यात घेतलेले पंकज आणि अभय यांच्यावर खूनाचा आरोप आहे. दोन वर्षांपूर्वी शहरापासून जवळच असलेल्या कुंडाणे शिवारात खून झाला होता. दोघांनी बंदुकीतून गोळी झाडून एका तरुणाला ठार मारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.