तेलंगणमधील मेडक जिल्ह्य़ात कामारेड्डी स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी क्रॉसिंगवर स्कूल बसला धडक देणारी नांदेड-हैदराबाद ही पॅसेंजर गाडी नियोजित वेळेनंतर तब्बल चार तास उशिराने येथील स्थानकातून सुटली होती. मात्र, ही गाडी वेळेत सोडली असती तर हा अपघातही टळू शकला असता. मात्र, लांब पल्ल्याची ही गाडी गेल्या काही दिवसांपासूनच कोणतेही संयुक्तिक कारण न देता उशिरानेच सोडली जात आहे. त्याचा हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी घडलेल्या अपघातातही २० शालेय विद्यार्थ्यांचा नाहक बळी घेतला गेला. मात्र, एवढे होऊनही रेल्वे प्रशासन ढिम्मच असल्याचे चित्र आहे.
नांदेड-हैदराबाद प्रवासी गाडी बुधवारी रात्री नियोजित वेळेत म्हणजे ११ वाजून ३० मिनिटांनी नांदेडहून सुटायला हवी होती. त्या दृष्टीने प्रवासी रेल्वेस्थानकात आले होते. मात्र, गेले अनेक दिवस न चुकता नियोजित वेळेच्या तीन-चार तास उशिरानेच कोणतेही कारण न देता ही रेल्वे सोडली जात आहे. बुधवारी रात्रीही तब्बल ४ तास उशिरा ही रेल्वे सोडण्यात आली आणि गुरुवारची सकाळ मेडकच्या स्कूलबसमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी काळरात्र ठरली. रेल्वेचा हा अक्षम्य हलगर्जीपणा निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवितावर घाला घालणारा ठरला. हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या याच गाडीतील नांदेडचे व्यापारी गोविंद क्षीरसागर यांनी या अपघाताचे भयानक या शब्दापेक्षाही भयावह अशा शब्दांत वर्णन केले. हा अपघात खरे तर टळू शकला असता. मात्र, रेल्वेकडून याचे उत्तर मिळायला हवे, अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया क्षीरसागर यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केली. या अपघातात बसचालकासह सुमारे २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य १० विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त होते. अपघाताचे स्वरूप पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
क्षीरसागर यांनीच या अपघाताचे व त्यापूर्वी कोणतेही कारण न देता उशिराने सोडलेल्या या रेल्वेच्या दिरंगाईचे नेमकेपणाने वर्णन केले. क्षीरसागर हे खासगी कामासाठी काही सहकाऱ्यांसह हैदराबादला निघाले होते. रात्रीच्या नांदेड-हैदराबाद प्रवासी रेल्वेचे आरक्षण होते. १० वाजून २० मिनिटांनी रेल्वे असल्याने १० वाजता नांदेड रेल्वेस्थानकावर हे सगळे पोचले. स्थानकात गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नांदेड-हैदराबाद गाडी अर्धा तास उशिराने निघेल, असे जाहीर केले. पण अध्र्या तासानंतर तांत्रिक कारण सांगत पहाटे ३ वाजता रेल्वे सुटेल, असे जाहीर केले. मध्यरात्र असल्याने घरी जाणे शक्य नव्हते. तब्बल ४ तास स्थानकावर थांबावे लागले.
चंद्रकांत विठ्ठलराव खुर्दामोजे, बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबुसेठ गिते व अन्य सहकारी मिळून हे सर्वजण पहाटे सव्वातीनला रेल्वेत बसले. ३ वाजून २० मिनिटांनी रेल्वे निघाली. सकाळी ९ वाजता ही गाडी कामारेड्डी स्थानकावर पोचली. ९ वाजून २० मिनिटांनी शाळेची बस रस्त्याने जाताना दिसली. पण ती आमच्याच रेल्वेच्या ट्रॅकवरून जाणार आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र, क्षणात होत्याचे नव्हते झाले. आमची रेल्वे स्कूल बसला धडकली. स्कूलबस किती फूट उंच उडाली, हे मी स्वत: बघितले. रेल्वे थांबल्यानंतर सर्वच प्रवासी मदतीसाठी धावले.
बसमध्ये साधारण ५०-६० विद्यार्थी असावेत. अपघाताचे स्वरूप इतके भयावह होते की, एखाद्या इंग्रजी चित्रपटातच शोभावे. चिमुरडी मुलं, त्यांची दप्तरं, कंपास, वॉटरबॅग, वह्या, पुस्तके, खाऊचा डब्बा सर्व विखरून गेलं होतं. ज्या विद्यार्थ्यांना मृत्यूने कवटाळले होते, ती निशब्द होती. पण जे मृत्यूच्या दाढेत होते, त्यांचे विव्हळणे पाषाणहृदयी माणसाला रडवणारे होते. तेलंगणातल्या काही प्रवाशांनी मेडक जिल्ह्यातल्या मसाईपेठ येथील डॉक्टर, नातेवाईक, पोलिसांना अपघाताची माहिती दिली. तब्बल २० मिनिटांनी रुग्णवाहिका, पोलीस दाखल झाले. परंतु तोपर्यंत अनेक विद्यार्थी मृत्यूच्या दाढेत लोटले गेले. नातेवाईकांचा आक्रोश, पालकांचा आकांत मन हेलकावणारा होता. याच ठिकाणी यापूर्वी तीन-चार अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. एवढय़ा लोकांचे जीव जाऊनही रेल्वेने काहीच उपाययोजना का केल्या नाहीत? असा सवाल क्षीरसागर यांनी केला.
माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनाही दोन दिवसांपूर्वी ही गाडी काही कारण न देता तीन-चार तास उशिराने सोडली गेल्याने मनस्ताप सहन करावा लागला. त्यांची मुलगी याच गाडीने हैदराबादला जाणार होती. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही गाडी सोडली जात नसल्याचे पाहून दुसऱ्या दिवशी खासगी वाहनाने ती हैदराबादला रवाना झाली.