उत्पादकांना दुप्पट नफा; आखाती देशांत चढय़ा दराने पुरवठा

 प्रशांत देशमुख 

करोनाचे थैमान सर्व क्षेत्राला घायकुतीस आणणारे ठरल्याचे चित्र एकीकडे असतानाच संत्रा उत्पादकांची मात्र करोनामुळे ‘दिवाळी’ झाली आहे. देशांतर्गत आणि आखाती देशात चढय़ा भावाने संत्र्याचा पुरवठा होत असून व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे खाण्याचा वैद्यकीय सल्ला संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवत आहे.

सध्या दुबईला चार जहाजांमधून संत्री पोहोचली असून पाचवे जहाज सध्या समुद्रात आहे. कतार व ओमान येथे तांत्रिक प्रक्रियेअभावी संत्री पोहोचलेली नाहीत. बांगलादेशात रोज शंभर ते दीडशे ट्रक संत्री पोहोचत आहेत. मुंबईत चढय़ा दराने संत्री विकली जात आहेत. ही मागणी पूर्ण करताना संत्रा व्यापाऱ्यांना दम लागत असल्याचे ‘महाऑरेंज’चे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत अपेक्षित पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. मृगबहार या वर्षी चांगला आला असून मागणीतील सातत्यामुळे शेतकरी सुखावल्याचे त्यांनी सांगितले. कृषीमालाची देशाबाहेर बाजारपेठ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी असणाऱ्या ‘अपेडा’ या केंद्रीय संस्थेने विदेशात पुरवठा होण्यासाठी केलेले प्रयत्न या वर्षी फळास आले.

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांनी सी व्हिटॅमिनयुक्त फळे साथीच्या रोगात चांगली असल्याचे मत व्यक्त केले. संत्र्यांमुळे प्रतिकारक्षमता वाढते. मात्र करोना हा नवीनच विषाणू असल्याने त्या संदर्भात अशी फळे कितपत उपयुक्त आहेत, यावर ठाम भाष्य करता येणार नाही. मात्र ते नुकसानदायी निश्चितच नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नागपुरी वर्चस्व..

दुबईत यापूर्वी पंजाबचीच ‘किन्नो’ ही चमकदार संत्री जात होती. या वेळी नागपुरी संत्री तेथे पोहोचली. १८० मॉल्सची साखळी चालविणाऱ्या ‘लूलू’ या कंपनीने पहिले कंटेनर विकल्यानंतर नागपुरी संत्रीची मागणी वाढू लागली. कंपनीच्या सगळ्या मॉल्समध्ये हीच संत्री विकली जात असून त्यांना जोरदार उठाव आहे. तसेच फळ व्यवसायातील ‘सफारी’ या कंपनीनेही नागपुरी संत्र्यांची मागणी नोंेदविली आहे.

कारण काय? :  संत्र्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य सुधारण्यास मदत होते, असा डॉक्टरांचा सल्ला संत्र्याची मागणी वाढण्यामागचे कारण ठरत आहे. संत्र्यातील पोषणमूल्य आजारातून लवकर बरे होण्यास उपयुक्त  ठरतात. त्यामुळे सध्या २० हजार रुपये टनाने विकली जाणारी नागपुरी संत्री लवकरच ३५ हजार रुपये टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

नागपुरी संत्री प्रथमच दुबईत गेली. त्यांची चव पाहून मागणी वाढल्याने ‘नागपुरी संत्री’ असे लेबल लावून ती विकण्याची मागणी लगेच मान्य झाली आहे.

– प्रशांत वाघमारे, अपेडाचे उपमहाव्यवस्थापक