कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृह राज्यमंत्री सतेज पाटील या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी टोलप्रश्नी राजीनामा देऊन जनआंदोलनात सहभागी व्हावे. तर, राज्य शासनाने ३१ जुलपर्यंत आपल्या अधिकारात टोल वसुली थांबवावी, अशी मागणी महायुतीच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
आमदार चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही असा निर्धार बोलून दाखविला.
सर्वोच्च न्यायालयाने टोल वसुलीला दिलेली स्थगिती उठविली आहे. कोणत्याही क्षणी टोल सुरु होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर महायुतीने टोलबाबतची आपली भूमिका शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. राज्य टोलमुक्त व्हावे ही महायुतीची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात टोल सुरु करु दिला जाणार नाही. टोल विरोधात महायुतीच्या वतीने आपली भूमिका निश्चित केली असून ती मुख्यमंत्र्यांना १६ मे नंतर त्यांची भेट घेऊन कथन केली जाणार आहे.
टोल विरोधात आंदोलन सुरु झाल्यानंतर हसन मुश्रीफ व सतेज पाटील या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी टोल पंचगंगेत विसर्जति करण्याचे आश्वासन दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा टोल सुरु होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी पूर्वी आपण दिलेल्या शब्दाचा मान ठेवून राजीनामा द्यावा. त्यांनी टोल विरोधातील जनआंदोलनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही महायुतीच्यावतीने करण्यात आले.