नागपूर-मुंबई महामार्ग क्र. ६ वर होऊ घातलेल्या चौपदरीकरणाच्या कामात नांदुरा ते चिखली रणथमपर्यंत जात असलेल्या जमिनींना देण्यात आलेले भाव अन्यायकारक असून त्या जमिनींना योग्य भाव देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीच्या सभेत करण्यात आली.
मलकापूर येथील हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीच्या सभागृहात राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार चैनसुख संचेती हे. तर प्रमुख उपस्थितीत उद्योजक अण्णासाहेब पाटील, संतोष बोरगावकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, सूतगिरीणीचे उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, संचालक नाना बोरले, अनंता पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार संचेती यांनी महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या उद्योजांच्या, लघुउद्योजकांच्या जमिनींना योग्य भाव देण्यात यावा, मिळालेले भाव अन्यायकारक असून याबाबत शासनाकडे पुन्हा पाठपुरावा करून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात येईल, असे सांगितले. दर कशाप्रकारे देण्यात आले व कशाप्रकारे अन्याय करण्यात आला, याबाबतची सविस्तर माहितीच सभेमध्ये सादर करण्यात आली. यात पूर्वीचे निवाडे रद्द करून सुधारित निवाडे पाठविण्यात आले. मात्र, जळगाव खांदेशच्या धर्तीवर देण्यात आलेले दर व आता देण्यात आलेल्या निवाडय़ातील दरात तफावत आहे, असे यावेळी सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शहरालगतच्या जमिनीकरिता शासन ५ कि.मी. पर्यंत टी.टी.एस. कापते म्हणजेच शासनाने शहरापासून ठरविलेली हद्द ही ५ कि.मी.ची आहे, असे सिध्द होते. मात्र, मलकापूर येथे हद्द कमी पकडून निवाडे पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी हा दर दिल्याचा आरोप रामभाऊ झांबरे यांनी केला.
नांदुरा येथे एकही जमीन शहरालगत धरण्यात आली नाही. नांदुरा व मलकापूर शहरालगतच्या ५ कि.मी. आतपर्यंत ३ हजार ५०० ते ५ हजार रुपयेपर्यंत दर खांदेशच्या धर्तीवर देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. याप्रसंगी प्रकल्पग्रस्त संजय कोलते, विशाल दवे, बाहेती, सोमनाथ जुनगडे, अॅड.पांडुरंग ढवळे, राजू डांगे, यदुराज पाटील, निलेश महाजन, संजय पाटील, विठ्ठल पाटील, भगवान परळकर, गोविंदा खडे, राहुल ढवळे, गणेश धामोडकर आदि उपस्थित होते.