मराठवाड्यात दुष्काळ पडूनही चारा छावण्या सुरु करण्यास सरकार तयार नाही. छावण्या सुरु करायच्या की ऑनलाइन चारा द्यायचा हे अजून मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं नाही. ऑनलाइनचा आम्ही धसका घेतला आहे. हे सरकार उद्या त्यासाठी जनावरांसोबतही सेल्फी मागेल अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वैजापूर या ठिकाणी केली. यावेळी त्यांनी राफेल करारावरून मोदी सरकारवरही निशाणा साधला. एचएएल सारख्या प्रसिद्ध सरकारी कंपनीला न देता अंबानींच्या कंपनीला राफेल करारात सहभागी करून घेण्यात आलं. यावरुनच मोदी सरकारचं अंबानीवरचं प्रेम किती उतू जातंय ते देशानं पाहिलं असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

वैजापूर तालुक्यात दुष्काळाची झळ लागायला सुरू झाली आहे. टॅंकर देऊ नका असे तोंडी आदेश सरकार देत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारने, पाणी नक्की कुठे आहे ते दाखवावं. नाहीतर जनता निवडणुकांमध्ये यांनाच पाणी पाजेल असा इशाराही मुंडे यांनी दिला.
सरकार चारा छावण्या सुरू करायला सरकार तयार नाही. मुख्यमंत्री अजूनही ठरवत आहेत की छावण्या सुरू करायच्या की ऑनलाइन चारा द्यायचा. ऑनलाइनचा तर आम्ही धसकाच घेतलाय. आता चाऱ्यासाठी गायी-गुरांना सोबत आणा असं म्हटल नाही म्हणजे मिळवलं असा टोला मुंडे यांनी लगावला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री फोजीया खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर , सुलक्षणा सलगर, आदी उपस्थित होते.