विधान परिषदेत गदारोळ, पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश

मुंबई : दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागण्यासाठी विधिमंडळात आलेल्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केल्यावर गदारोळ झाला.

या शेतकऱ्याची तातडीने सुटका करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली, तरी सरकारकडून बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे, असे सांगून मुंडे यांनी मनवरची कागदपत्रे सभागृहात दाखविली. हा शेतकरी आपल्याला भेटून गेल्यानंतर त्याला मरीनलाइन्स पोलिसांनी अटक केली. अन्याय झाल्याने दाद मागणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. विरोधकांनी सरकारवर टीका केल्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीची आकडेवारी सभागृहात सादर केली. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

सभापतींच्या निर्देशानंतरही सायंकाळपर्यंत या शेतकऱ्याची सुटका न झाल्याने मुंडे यांनी पुन्हा हा मुद्दा मांडल्यावर या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन सभागृह नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिले.