सातारा येथील वन्यजीव संशोधक डॉ.अमित सय्यद यांनी केरळमधील जंगलात केलेल्या संशोधनातून पालीचा एका नव्या प्रजातीच्या शोध लावला आहे. या पालीचे ‘निमस्पिस पलक्काडंसिस‘ असे नामकरण करण्यात आले आहे. अमेरिकेतील ‘अँफिबिया अँड  रेप्टिलिया’ या जागतिक संशोधन पत्रिकेने हा संशोधन अहवाल प्रकाशित करून त्यावर मान्यतेची मोहर उमटवली आहे.

केरळच्या पलक्काड मधील एका जंगलामध्ये ही पाल आढळली. या पालीच्या पाठीवर तपकिरी व काळ्या रंगाची नक्षी आहे. तिच्या जबडय़ाखालील भाग हा गडद केशरी असून पोटाकडची बाजू पांढरी आहे. मे २०१९ मधे केरळच्या या जंगलात वन्यजीव अभ्यासासाठी वन्यजीव संरक्षण आणि संशोधन समिती (डब्ल्यूएलपीआरएस) या संस्थेची टीम गेली होती. त्यात डॉ. सय्यद यांचा समावेश होता. या अभ्यास दौऱ्यात त्यांना ही पाल आढळली. ही पाल अगदी ‘निमास्पिस लिटोरोलीस’ या पालीसारखी दिसत असल्याने आजपर्यंत तिला याच नावाने ओळखले जात होते. ‘निमास्पिस लिटोरोलीस’ ही भारतातील पश्चिम घाटात केरळमध्ये आढळणारी पाल आहे. ही १८५३ साली जेडॉन नामक ब्रिटिश संशोधकाने ‘मलबार केरळ’ मधून तिची नोंद केली होती.

डॉ. सय्यद हे गेली काही वर्षे याच कुळातील पालींचा अभ्यास करत आहेत. यासाठी ते भारतातील विशेषकरून अंदमान-निकोबार या जंगलांना सतत भेट देत आहेत. यातूनच २०१९ मध्ये पालीची नवी प्रजाती त्यांना आढळली. एका वर्षांच्या अभ्यासानंतर या पालीला नवी ओळख देण्यात त्यांना यश आले.

डॉ. सय्यद यांनी आजवर ७ पाली, एक विंचू, एक बेडूक अशा आजपर्यंत ९ नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. ‘निमस्पिस पलक्काडंसिस’ या पालीच्या शोध मोहिमेत विवेक फिलिप, रवींद्रन दिलीपकुमार तसेच डॉ. विवेक विद्यनाथन, अभिजित नाळे, महेश बंडगर, किरण अहिरे, विकास जगताप यांनीही  मदत केल्याचे डॉ. सय्यद यांनी सांगितले.