नाशिक महापालिकेच्या महासभेत आज अभूतपूर्व गोंधळ आणि राडा पाहण्यास मिळाला. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील गोडसे यांनी पाणी प्रश्नावर आंदोलन सुरु केले. महासभेत मातीचे मडके फोडले त्यामुळे वादवादी सुरु झाली. महिला नगरसेवकही चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. नगरसेवक सुनील गोडसे यांनी अशोभनीय कृत्य केल्याची टीका महिला नगरसेवकांनी केली.

नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ सुरु झाला. महासभा सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मागच्या वेळी झालेल्या महासभेत तहकूब ठेवण्यात आलेल्या विषयांची माहिती का दिली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. इतकंच नाही तर तहकूब झालेले विषय परस्पर मान्य केले जात असल्याचाही आरोप विरोधकांनी केला. महासभेत गदारोळ इतका वाढला होता की कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.