जिल्हा बँकांना चलन बदलातून वगळण्याचा निर्णय बदलावा यासाठी पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली आंदोलने ही त्यातील राजकीय सहभागामुळे सध्या चर्चेत आहेत. या आंदोलनात बँकांआडून राजकारण करणारे नेते, बँकेचे कर्मचारीच सर्वत्र दिसत आहेत. या सहकारी बँकांच्या माध्यमातून गावोगावच्या सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पतपुरवठा केला जातो.  या बँकांमधून दिले जाणारे फायदेही राजकीय हेतूतून होऊ लागले. परिणामी आज राज्यातील जिल्हा बँका या मोठय़ा प्रमाणात आजारी, गैरव्यवहारात बुडालेल्या दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्हा बँकांचे गेल्या काही वर्षांतील ‘चौकशी सत्र’ पाहिले तर हे स्पष्टपणे जाणवते.

सहकारी संस्थांना अर्थसाह्य़ मिळविण्यासाठीच या जिल्हा बँकांचा प्रामुख्याने उपयोग केल्याचे दिसत आहे. असे नियमबाह्य़ कर्जपुरवठा केला गेल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५७ कोटींचे नुकसान झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. याच पद्धतीने कोल्हापूर, सोलापूर जिल्हा बँकेतही अनियमित कर्जपुरवठा झाल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. सोलापुरात जिल्हा बँकेने संचालकांशी संबंधित संस्थानाच कर्जे वाटल्याचे प्रकरण आहे. तर कोल्हापूर जिल्हा बँकेविरुद्ध तर कारवाईचे आदेशही निघालेले आहेत. या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई एकीकडे सुरू असतानाही काही मंडळी पुन्हा बँकेचे कारभारी झाले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या संचालकांच्या पुनर्नेमणुकीबाबतही सरकारी पातळीवर निर्णय होत आहेत. या पाश्र्वभूमीवर आता या बँकांची ही चालक मंडळीच पुन्हा चलनपुरवठय़ाबाबत अन्याय झाल्याची ओरड करत मोर्चे काढू लागल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.

धनादेशाचा पर्याय

जिल्हा बँकांमध्ये प्रामुख्याने शेतकरी, शिक्षक, कर्मचारी यांची खाती आहेत. त्यांनी धनादेशाद्वारे आपले पसे अन्य राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळवत पसे मिळविण्याचा मार्ग शोधला आहे. ज्यांचे अन्य बँकेत स्वत:चे असे खाते नाही त्यांनी मुलाच्या किंवा अन्य नातलगांच्या नावे धनादेश काढत रक्कम मिळवली आहे.

ग्राहक राष्ट्रीयीकृत बँकांकडे

जिल्हा बँकातून सहज सुलभ मिळणाऱ्या कर्जामुळे आकृष्ट झालेला शेतकरी चलनटंचाईच्या या अनुभवानंतर आता राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. साखर कारखान्याचा सभासद आणि जिल्हा बँकेचा ग्राहक हा या राजकीय नेत्यांचा ‘मतदार’ असतो. पण आता या परिस्थितीत त्याची गरज भागवू न शकल्याने तो दूर जात असल्याचे पाहूनही हे सहकार सम्राट धास्तावले आहेत.