डहाणू शहरात रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करण्यास जिल्हाधिकाऱ्याचा मज्जाव

पालघर : डहाणू नगर परिषद क्षेत्रात सागर नाका ते स्थानक रस्तादरम्यान मधोमध वाहने उभी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. तसे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सन २००५ पासून डहाणू शहरामध्ये रस्त्याकडेला जागा नसल्याने तसेच रस्त्याकडेला वाहने  उभी केल्यास दुकानदारांना अडचणी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून  रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करण्यास सुरुवात झाली होती. मात्र वाहनांची संख्या वाढत गेल्याने रस्त्यांवरून वाहन चालवणे त्रासदायक झाले होते.

या व्यवस्थेमुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यता तसेच वाहनचालक व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, वाहनांचे वळण सोयीचे व्हावे याकरिता जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करण्यास मनाई आदेश जारी केला आहे.

सन २०१५ पासून अरुंद असलेल्या या भागात वाहने उभी करू नयेत यासाठी नगर परिषद स्तरावर प्रयत्न करण्यात येत होते, मात्र नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशामुळे डहाणूमधील रस्त्याच्या मध्यभागी असलेली वाहनतळ व्यवस्था संपुष्टात येणार आहे.

सम-विषम तारखेचा अवलंब

सागर नाका ते रेल्वे स्थानक यादरम्यानचा रस्ता अरुंद असून याच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग केल्यास वाहनांची वाहतूक होण्यास कठीण होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर डहाणू येथे सम व विषम तारखेनुसार रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग व्यवस्था करावी लागेल, असे डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी  सांगितले.

रेल्वे वाहनतळ खुले करावे

उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या वाहनतळाच्या जागेत रिक्षा, एसटी बस तसेच आवश्यकता भासल्यास रुग्णवाहिका व खासगी वाहने उभी करण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी आहे. मात्र डहाणू येथे अशा प्रकारच्या व्यवस्थेवर रोख लावण्यात आल्याने रिक्षा अरुंद असणाऱ्या रस्त्यावर उभ्या करणे भाग पडत आहे. डहाणू शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेने आपली वाहनतळ व्यवस्था खुली करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.