09 August 2020

News Flash

या अडचणीच्या काळात कामगार कपात करु नका; मुख्यमंत्र्याचं व्यवस्थापनांना आवाहन

काही काळासाठी वेतन कपात चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

संपूर्ण जगात सध्या करोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये, कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटत असतो. त्यामुळेच भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई आणि पुण्यासारख्या भागात करोनाच्या केसेस वाढत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटापासून आपण ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रात अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उद्योग व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याठिकाणी आज अनेक उद्योग सुरु झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांमध्ये ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे, परंतू परिस्थिती सुधारत जाईल. आपण मालवाहतुक थांबवलेली तर माणसांची वाहतूक थांबवली आहे जेणे करून साथीचा प्रसार होणार नाही. जिथे उद्योग सुरु झाले आहेत तिथे आपण व्यवस्थापन आणि कामगार यांच्या कोविड दक्षता समित्या स्थापन करू शकतो का? ते पाहिले पाहिजे जेणे करून उद्योगांत आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण तयार होईल.”

जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका

काही उद्योग आणि व्यवसायांतून नोकर कपात सुरु असल्याचे कळते ते चुकीचे असून कामगारांना नोकरीवरून काढू नका, अशी आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मी स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहे. एकीकडे कारखाने हे परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहेत. अशा स्थितीत जे उपलब्ध आहेत त्यांना लगेच नोकऱ्या द्या आणि व्यवसाय सुरु करा, पण नव्या नोकऱ्या देतांना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

औद्योगिक कामगार ब्युरो सुरु

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, “औद्योगिक कामगारांच्या नोकरीविषयक तक्रारी तुलनेने कमी आहेत. परंतू सेवा क्षेत्र मात्र अडचणी आलेले आहे. त्यांचा व्यवसाय सुद्धा कमी झाला आहे. कंपन्या आणि मालकांसमोर सुद्धा अडचणी आहेत. मात्र, कामगार, कर्मचारी यांचे कुटुंब चालेल, चूल पेटेल अशी समंजस भूमिका घेणे गरजेचे आहे. मालकांशी सातत्याने संवाद साधून मार्ग काढता येईल. त्यासाठी देशातील पहिल्या औद्योगिक कामगार ब्युरोचे उद्घाटन आपण करीत आहोत जेणे करून कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळेल.”

काही व्यवस्थापन परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कामगार कपात करीत आहेत, विशेषत: कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. सेवा उद्योग अडचणीत आहे. सर्व हॉटेल्स मेटाकुटीला आले आहे, कायम कामगारांवर वेतन कपातीची टांगती तालावर आहे. डिसेंबरपर्यंत ही वेतन कपात करावी असे सांगण्यात येत आहे. हॉटेल्स, आयटी, लॉजिस्टिकमध्ये कामगारांना कमी करणे सुरु आहे, छोट्या कंपन्यांनी तर कपातीचाच मार्ग अवलंबिला आहे अशा प्रकारच्या अडचणी यावेळी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 5:36 pm

Web Title: do not cut workers during these difficult times chief minister uddhav thackeray appeal to the management aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 शुल्क की वसुली? : ५०० रुपयांची पीपीई किट १०,५०० रुपयांना; दहा दिवस उपचार, उकळले पंधरा दिवसांचे पैसे
2 राज्यात पोलिसांना करोनाचा वाढता संसर्ग; २४ तासांत चौघांचा मृत्यू, ३० नवे पॉझिटिव्ह
3 देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक : काय आहे पुस्तकात? वाचा…
Just Now!
X