रायगड जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आजारी पडली आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश सर्व रुग्णालयांत डॉक्टरांची ५० टक्क्यांहून अधिक पदे सध्या रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी खालगी रुग्णालये अथवा मुंबई पुण्यातील शासकीय रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

मुंबई पुण्याच्या जवळ असूनही जिल्ह्य़ात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. जिल्ह्य़ात १ जिल्हा रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालये आणि ८ ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्ग २ प्रवर्गातील एकूण १०० पदे मंजूर आहेत. यातील ५९ पदे भरण्यात आली आहेत. मात्र यातील प्रत्यक्ष केवळ ३६ वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहेत. भरलेल्या पदांपकी जवळपास २३ वैद्यकीय अधिकारी कामावर हजरच झालेल नाही. म्हणजेच एकूण मंजूर पदाच्या ६४ टक्के पदे सध्या रिक्त आहेत.
जिल्हा रुग्णालयाची परिस्थितीही फारशी चांगली नाही. रुग्णालयात वर्ग १ची १९ पदे मंजूर आहेत. यांपकी ७ पदे भरलेली आहेत. यातील ६ डॉक्टर प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तर वर्ग २ साठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३० पदे मंजूर आहेत. यातील १८ पदे भरलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र केवळ १० डॉक्टर काम करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिषक (फिजीशिअन), सर्जन, कान-नाक-घसातज्ज्ञ, रेडीऑलॉजिस्ट, दंतचिकित्सक यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळू शकत नाही. तर दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रियादेखील होऊ शकत नाही.
राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयातील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. शासकीय सेवेत असताना खासगी रुग्णालय चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेली आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील कानाकोपऱ्यातून उपचारासाठी अलिबागला येणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहे. दुर्धर आजारांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालय आणि मुंबई-पुण्यातील शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो आहे. मात्र यासाठी वेळ आणि पसा खर्ची पडत आहेत. दुर्दैवाने कुठल्याही राजकीय पक्षाला या संवेदनशील प्रश्नाकडे लक्ष देण्यात रस असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्न तसाच कायम राहिला आहे. ‘वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. वेळोवेळी त्याबाबत पत्रव्यवहार केला जातो आहे. लवकरच ही पदे भरली जातील. तोवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने चांगली रुग्णसेवा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे,’ असे रायगडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाहुबली नागवकर यांनी सांगितले.