कामगाराच्या भावनांशी खेळू नका, वेळ आलीच तर संपाचे हत्यार उपसण्याची आमची तयारी आहे, असा इशारा भारतीय कामगार महासंघाचे नेते भाई जगताप यांनी रिलायन्स कंपनीला दिला आहे. ते नागोठणे येथील रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या कामगार मेळाव्यात बोलत होते.
कंपनीतील १३३७ कामगारांपैकी ९००हून अधिक कामगार हे भारतीय कामगार महासंघाशी निगडित आहे याची जाणीव कंपनी प्रशासनाने ठेवली पाहिजे कामगार आणि स्थानिकांच्या काही व्यथा आहेत. त्यांचा कंपनीने सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे असल्याचेही जगताप यांनी म्हटले आहे. कामगाराच्या प्रश्नांवर कंपनी चर्चेसाठी समोर आली नाही तर भाई जगताप स्टाइलने आंदोलन केल जाईल, असेही ते म्हणाले. कायद्याच्या चौकटीत राहून आरपीसीएलविरुद्ध लढा उभारणार असून त्याची दखल कंपनी प्रशासनाला घ्यावीच लागेल, असा इशारा जगताप यांनी दिला. महासंघाचे युनिट अध्यक्ष उद्धव कुथे यांच्यासह निलंबित करण्यात आलेल्या चार जणांचे निलंबन तातडीने मागे घेतले जाईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
पोलिसांनी कंपनी आणि कामगारांच्या प्रश्नात उगाचंच नाक खुपसू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. कायद्याचे आपल्याला चांगले ज्ञान असून त्या कक्षेत राहूनच आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. गेल्या २५ वर्षांष्या कामगार चळवळीत मी कधीही संपाचे हत्यार उपसले नाही. मात्र पहिल्यांदाच संपासाठी आपण कंपनीला नोटीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रिलायन्स प्रशासनाला जर संप नको असेल तर आपल्याशी चर्चा करा आणि आपल्याच पद्धतीने महासंघाशी करार करा, असा इशारा त्यांनी दिला. या कामगार मेळाव्याला महासंघाचे युनिट अध्यक्ष उद्धव कुथे, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे, एनएपीएलचे कामगार नेते गणेश बडे, उमेश ठाकुर, सरपंच प्रीती कुथे, उज्ज्वला पाटील आदी उपस्थित होते.