News Flash

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांना भालचंद्र मुणगेकरांचं खुलं पत्र

नयनतारा सहगल प्रकरणावरुन पत्रात काय म्हटलंय, वाचा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण यंदाही कायम आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्याने त्याचे विविध स्थरात पडसाद उमटत आहेत. दरम्यान, याच वादावरुन संमेलनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांना ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्र पाठवलं आहे.

काय म्हटलंय पत्रात –
आदरणीय, श्रीमती अरुणाताई ढेरे,
सादर प्रणाम.

प्रत्येक वर्षी कोणत्या त्या कोणत्या भानगडीत अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या वर्षी आपली बिनविरोध निवड झाली. ही मराठी जणांना सुखावणारी गोष्ट आहे.
परंतु यावेळी, साहित्य अकादमी सन्मानपात्र ख्यातनाम साहित्यिका श्रीमती नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण संयोजकांनी अचानक रद्द केले आणि भानगडींची परंपरा सुरु ठेवली.
सहगल याचे निमंत्रण रद्द केल्यानंतर मराठी साहित्य-विश्वात निर्माण झालेल्या वादळाची आपल्याला कल्पना आहे. सहगल इंग्रजी भाषिक साहित्यिक आहेत, म्हणून त्या आल्यास संमेलनात गोंधळ घालू,हे कारण सांगून काही झुंडशाही प्रवृत्तींनी दिलेल्या धमकीमुळे त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. खरे कारण, सेहगल एक संवेदनशील साहित्यिका असल्यामुळे त्या देशातील प्रचलित वाढत्या असहीश्नुतेवर भाष्य करणार होत्या, हे आहे.

आता संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून याबाबत आपली भूमिका महत्वाची आहे. आपल्या साहित्य-सेवेबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून,साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा, आणि तो ही बिनविरोध, सन्मान आपल्याला मिळालाच आहे. आता संमेलनाच्या मंचावरून अध्यक्षीय भाषण करणे, हा एक औपचारिकपणा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडून मराठी साहित्याविषयी जाणिवा घेतलेल्या माज्या सारख्याला या औपचारिकपणाचे महत्त्व ठावूक आहे. परंतु कोणत्याही कारणामुळे, प्रचलित परिस्थितीत आपण संमेलनास उपस्थित राहून अध्यक्षीय भाष्य केल्यास कणाहीन संयोजाकांप्रमाणेच आपणही असहिष्णुता आणि झुंडशाहीसमोर शरण गेल्यासारखे होईल. भारतातील उदारमतवादाचे जनक असलेल्या युगपुरुष न्या. रानडे यांच्या विचारविश्वाशी ती प्रतारणा ठरेल. आपल्या सद्सदविवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे.

आपला,
डॉ. भालचंद्र मुणगेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 7:50 pm

Web Title: dr bhalchandra munagekars open letter to 92nd akhil bharatiya marathi sahitya sammelan chairman dr aruna dhere
Next Stories
1 एफआरपीसाठी आर्थिक मदतीचा विषय आता पंतप्रधानांकडे, मोदी सोलापुरात घोषणा करणार?
2 ‘आज आम्ही मंत्रालयात अडवलं, उद्या ही जनताच अडवेल’
3 कोतवालांच्या मानधनात २५०० रूपयांनी वाढ
Just Now!
X