पाचोरा : करोनाबाधितच काय परंतु, संशयित म्हणून विलगीकरणात असलेल्यांच्याही आसपास कोणी जाण्यास तयार नाहीत. बहुतांश खासगी डॉक्टरांनी आपली जबाबदारी पार पाडण्याऐवजी दवाखाने बंद ठेवण्यात धन्यता मानली असतांना काही समाजसेवी डॉक्टर मात्र करोनाची भीती न बाळगता रूग्णांवर उपचाराचे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातीलच एक असलेले भडगाव येथील डॉक्टर नीलेश आणि पल्लवी हे  पाटील दाम्पत्य दररोज करोना रूग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सकाळी योगा तर सायकांळी विविध  खेळ घेत आहेत.

भडगावात करोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर आणि पालिकेच्या फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही त्यांच्याजवळ जाण्यास तयार नाही. संशयित म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या लोकांपर्यंतही जाण्यासही सर्व घाबरत आहेत. अगदी तेथे कार्यरत कर्मचारीही दूर बसतात. सध्या खासगी डॉक्टरही रूग्णांपासून अंतर ठेवून आहेत.

अशा परिस्थितीत भडगाव येथील डॉक्टर नीलेश पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी गेल्या आठवडय़ापासून दररोज सकाळी आणि संध्याकाळी करोना बाधितांना योगाचे धडे देत आहेत. सायकांळी विविध खेळ घेत आहेत. रूग्णांमध्ये याव्दारे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी हे फायदेशीर ठरतांना दिसत आहे. रुग्णही योगा आणि विविध खेळात रमल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता वाढीस मदत होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पाटील दाम्पत्य ही सेवा देत आहे.

भडगावमधील सध्याचे करोना केअर सेंटर अपुरे पडत असल्याने नविन उपचार केंद्र सुरू करण्यात यावे. तेथेही आपण त्या रूग्णांवर  उपचार करण्यास तयार आहोत. त्यासंदर्भात तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन दिले आहे. करोनाबाधितांकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. कुष्ठरोगीपेक्षा हीन दर्जाने त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्या रूग्णांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीबरोबरच राष्ट्रीय एकात्मताही धोक्यात आली आहे. त्यामुळेच आम्ही या रूग्णांना आपलेपणा वाटावा, त्यांचे मनोधैर्य वाढावे म्हणून योगा, विविध खेळ घेत आहोत. त्याला रूग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

– डॉ. नीलेश पाटील, जळगव जिल्हा सहसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आम्ही बाधित रूग्णांवर उपचार करीत आहोत. पण त्यांचे मनोधैर्य वाढविणे, रोगप्रतिकार शक्ती वाढविणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे डॉ. नीलेश पाटील आणि डॉ. पल्लवी पाटील यांनी आयटीआयमधील बाधितांसाठी योगाचे वर्ग घेतल्याने रूग्णांना ते लाभदायी ठरत आहेत. -डॉ.पंकज जाधव, वैद्यकीय अधिकारी, भडगाव