पेमराज सारडा महाविद्यालयाच्या (नगर) ‘ड्रायव्हर’ या लोकांकिकेने नगर केंद्रावरील विभागीय अंतिम फेरीतून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला. प्रथम क्रमांकासह सहा पारितोषिके या लोकांकिकेने पटकावली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते मंगेश कदम, ज्येष्ठ अभिनेत्री लीना भागवत व अभिनेते शशांक केतकर यांच्या हस्ते दिमाखात झाले.
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची नगर विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी माउली नाटय़गृहात दिमाखात पार पडली. नगरला झालेल्या प्राथमिक फेरीत ११ लोकांकिका सादर झाल्या होत्या. त्यातील ‘वारुळातील मुंगी’ (न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर), ‘प्रतिगांधी’ (बाळासाहेब भारदे महाविद्यालय, शेवगाव), ‘घुसमट’ (डी. जे. मालपाणी महाविद्यालय, संगमनेर), ‘ड्रायव्हर’ (पेमराज सारडा महाविद्यालय, नगर) आणि ‘तपोवन’ (अहमदनगर महाविद्यालय) या पाच लोकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या होत्या. या लोकांकिकांच्या विभागीय अंतिम फेरीत ‘ड्रायव्हर’ (पेमराज सारडा महाविद्यालय, नगर) या लोकांकिकेने बाजी मारली. स्पर्धेतील सहा पारितोषिकांसह ही लोकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. १७ला मुंबईत होणार आहे. नगर केंद्रावरील अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून रेणुका दप्तरदार (पुणे), अभिजित क्षीरसागर (नगर) व रूपाली देशमुख (नगर) यांनी काम पाहिले.
अस्तित्व या संस्थेच्या मदतीने ‘लोकसत्ता’च्या राज्यातील आठ केंद्रांवर ही स्पर्धा सुरू आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफीस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेला नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल, रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम, टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र वाहिनी यांचे सहकार्य लाभले आहे. आयरीस प्रॉडक्शन हे या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असून त्यांचा सहभागी कलाकारांमधून गुणवत्तेचा शोध सुरू आहे.

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘ड्रायव्हर’  
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘वारुळातील मुंगी’
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘तपोवन’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अमोल साळवे (ड्रायव्हर)
सर्वोत्कृष्ट लेखक- अमोल साळवे (ड्रायव्हर)
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)- गौरी मार्डिकर (ड्रायव्हर)
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)- विनोद गरुड (ड्रायव्हर)
सर्वोत्कृष्ट प्रकाशय़ोजना- अमोल साळवे (ड्रायव्हर)
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- अविनाश मचे (वारुळातील मुंगी)
सर्वोत्कृष्ट संगीत- सिद्धान्त खंडागळे (वारुळातील मुंगी)