|| गणेश जेवरे

दुष्काळामुळे नगर जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यातील रेहकरी अभयारण्यातील हरणे व काळविटांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे या मुक्या प्राण्यांसाठीही टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे.

वनक्षेत्रपाल  एस. व्ही. पाटील यांनी सांगितले, की दुष्काळामुळे पाणी व चाराटंचाई निर्माण झाली असून पुढील काही महिन्यामध्ये हरणांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार आहेत.

कर्जत तालुक्यात या वर्षी अत्यल्प पाऊस पडला असून खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. त्याच प्रमाणे सर्वत्र चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळाची झळ कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभय अरण्या मधील वन्यजीवांना पण बसू लागली आहे.

रेहकुरी अभय अरण्याचे क्षेत्र २.१४ चौरस किमी आहे.  तेथे  हरीण, काळवीट, चिंकारा, खोकड, लांडगे, मोर, शिक्रा यांसह अनेक प्राणी मोठय़ा संख्येने आहे. दरवर्षी येथील काळवीट आणि हरीण यांची संख्या वाढत आहे. हे खुरटय़ा वनस्पतींचे जंगल असून यामध्ये प्रामुख्याने खैर, हिवर, शिसवी, बाभळी, चंदन, बोर, करवंदे ही झाडे आहेत.

रेहकुरी अभयारण्यामध्ये पाऊस पडला नाही त्यामुळे जंगलामध्ये फारसे गवत उगवले नाही. येथे असलेले हरीण, काळवीट आणि चिंकारा या प्राण्यांचे गवत हेच प्रमुख खाद्य आहे. हिरवे आणि वाळलेले असे दोन्ही प्रकारचे गवत ते खातात मात्र या वेळी जंगलामध्ये गवत नसल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून चाऱ्याच्या शोधामध्ये हरीण व काळविटे जाऊन त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.

पाणस्थळामध्ये दगडगोटे टाकण्याची संकल्पना

रेहकुरी अभयारण्यामध्ये हरणांसाठी ७ पाणस्थळे आहेत. पाणी कमी पडू लागल्याने दोन पाणस्थळामध्ये पाणी सोडण्यात येते मात्र या पाणस्थळामध्ये पण दगडगोटे टाकण्यात आले आहेत याचे कारण काय अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले, विदर्भामध्ये पाण्याची बचत आणि पाणी जास्त दिवस चांगले राहावे यासाठी पाणस्थळामध्ये दगड टाकण्याचा प्रयोग यशस्वी झाला असल्याने त्यांनी हाच प्रयोग रेहकुरी येथे राबवला आहे. यामुळे हरणे पाण्यात जात नाही त्यांची विष्टा त्यामध्ये पडून पाणी खराब होत नाही, तसेच पाणस्थळामध्ये कमी पाणी बसते आणि बाष्पीभवन कमी होते. वनक्षेत्रपाल पाटील म्हणाले, सरकारने एक टँकर अभयारण्यासाठी द्यावा, अशी आमची मागणी असून तसा अर्ज तहसीलदार यांचेकडे करणार आहे.

पाणथळाची व्यवस्था

अभयारण्याच्या लगत छोटाचा पाण्याचा तलाव आहे  हा तलाव कोरडाठाक पडला आहे. या तलावाशेजारी एक विहीर असून त्या मधून प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. हरणांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जंगलामध्ये पाणस्थळे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये पाइपलाइन द्वारे पाणी सोडून तिथे पाणी साठवले जाते आणि या ठिकाणी हरीण पाणी पिण्यास येतात. मात्र आता या पाणस्थळामध्ये तलाव आणि विहीर दोन्ही कोरडे पडल्याने पाणी पुरेसे सोडता येत नाही. यामुळे आता या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी इतर पाणस्थळे बंद  केली असून जंगलामध्ये फक्त दोन पाणस्थळांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे.