News Flash

राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबवण्यात येणार आहेत

राज्य सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आल्याने केंद्राची टीम लवकरच महाराष्ट्रात दाखल होऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येईल. दरम्यान दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी ज्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत त्यामध्ये जमीन महसुलातून सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या बिलात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कात सूट, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे यांचा समावेश आहे.

केंद्राची टीम महाराष्ट्रात आल्यानंतर दुष्काळासंबधी मदत जाहीर करेल. राज्य सरकारच्या अख्त्यारित दुष्काळ घोषित करणं आणि उपाययोजना राबवणं असल्याने आम्ही ते केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी चारा छावण्याची वेळ अद्याप आलेली नाही, आणि ती येणार नाही असंही सांगितलं.

कर्नाटकने काय केलं माहित नाही, पण त्यापेक्षा जास्त उपाययोजना आपण जाहीर केल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जलयुक्त शिवाराचं राजकारण करणं हा शेतकऱ्यांचा आणि मेहनत घेतलेल्या लोकांचा अपमान आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली. जलयुक्त शिवार त्यांना कळलेलं नाही म्हणून त्यांनी अंमलबजावणी केली नाही असंही ते म्हणालेत. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी जनतेचा अपमान करु नका अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 12:58 pm

Web Title: drought like situation in 180 taluka of maharashtra
Next Stories
1 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार – शरद पवार
2 सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल – शरद पवार
3 मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक; दोन धावपट्ट्या 6 तासांसाठी बंद
Just Now!
X