यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू होण्याचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही आल्याचे दिसत आहे. द्राक्षावर फवारणी करताना विषबाधेमुळे बेशुद्ध पडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. संतोष बाळासाहेब शिंदे (वय २५, रा. अरण, ता. माढा) असे या शेतकऱ्याचे नाव असून गेल्या १८ दिवसांपासून त्याच्यावर सोलापूर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, जिल्हाधिकारी स्वत: रूग्णालयात येऊन संबंधित औषध कंपनीवर कारवाई ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. यासंदर्भात पालकमंत्री विजय देशमुख यांचेही लक्ष वेधण्यात आले होते.

संतोष शिंदे हे १८ दिवसांपूर्वी शेतातल्या द्राक्षावर निऑन या कीटकनाशकाची फवारणी करत होता. विषबाधेमुळे तो बेशुद्ध पडले. त्याला त्वरीत खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास निधन झाले. मृत शिंदे यांच्या नातेवाईकांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, बसपचे माजी नगरसेवक बबलू गायकवाड, निवृत्त पोलीस अधिकारी एस. बी. तागतोडे आदी मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी रूग्णालयात ठाण मांडून होते.