03 March 2021

News Flash

‘आयएलएफएस’च्या अडचणीमुळे महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामामागे कायमचे दुष्टचक्र लागले.

(संग्रहित छायाचित्र)

प्रबोध देशपांडे

‘आयएलएफएस’ कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे अमरावती ते नवापूपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम पाच महिन्यांपासून ठप्प आहे. निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की ओढावू नये म्हणून केंद्र सरकारकडून चौपदरीकरणाच्या कामासाठी कंपनी बदलण्याच्या जोरदार हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामामागे कायमचे दुष्टचक्र लागले. अमरावती ते नवापूपर्यंतचा ४८०.७९ कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम विविध कारणांमुळे २०१३ पासून रखडले आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रकल्पाला मंजुरी देऊन एल अ‍ॅण्ड टी कंपनीला काम दिले होते. भूसंपादनातील दिरंगाईसह विविध अडचणींमुळे काम सुरु होण्यापूर्वीच एल अ‍ॅण्ड टी कंपनीने काम सोडले. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात तरी महामार्गाच्या चौपदरीकरणाला तीव्र गती मिळेल, अशी अपेक्षा होती. चौपदरीकरणाचे रखडलेले काम सुरू करण्याचे जाहीर करून नितीन गडकरींनी ३१ ऑक्टोबर २०१५ ला अकोल्यात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. प्रत्यक्षात मात्र कामाला गती काही मिळाली नाही. अमरावती ते चिखली १९४ कि.मी. आणि फागणे ते नवापूर १४०.७९ कि.मी. अशी कामाची विभागणी करण्यात आली. अमरावती ते चिखलीपर्यंतचे २२८८.१८ कोटी रूपयांचे कंत्राट ‘आयएलएफएस’ अंतर्गत असलेल्या ‘आयटीएनएल’ कंपनीला देण्यात आले. चौपदरीकरणाचे संपूर्ण काम ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ (बीओटी) तत्त्वावर असल्याने गुंतवणूकदार तयार करून ८० टक्के भांडवल उभे करण्याचे मोठे आव्हान कंत्राटदार कंपनीपुढे होते. गुंतवणूकदार मिळत नसल्याने अडचणीत भर पडून कामाचा खोळंबा कायमच राहिला. यातून मार्ग काढत डिसेंबर २०१७ पासून अमरावती ते चिखलीपर्यंतच्या कामाला गती दिली गेली. दोन वर्षांत १० टक्के झालेले काम आठ महिन्यातील कामामुळे सध्या सरासरी २२ टक्क्यांवर काम आले. मात्र, पुन्हा एकदा महामार्गाचे काम जुलै महिन्यापासून ठप्प पडले आहे. मे २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठणे आता अशक्य झाले.

मूळ कंत्राटदार कंपनी आर्थिकदृष्टय़ा डबघाईस आली. ‘आयएलएफएस’ कंपनी आर्थिक दुष्टचक्रात सापडली. त्याचा फटका महामार्गाच्या चौपदरीकरणाला बसून काम बंद पडले. उपकंपन्यांनीही रस्त्याचे अर्धवट काम सोडून आपला गाशा गुंडाळला. ‘आयएलएफएस’च्या आर्थिक अडचणीमुळे देशभरातील १७ पेक्षा अधिक मोठे प्रकल्प ठप्प पडले आहेत.

‘आयएलएफएस’ची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा नीट करून महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खासदार संजय धोत्रे यांनाचाही पाठपुरावा सुरू आहे. ‘आयएलएफएस’च्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी कंपनीवर सरकारी अधिकाऱ्यांचे मंडळ नियुक्त करण्यात आले. ‘आयएलएफएस’चे अर्धवट रखडलेले प्रकल्प ‘ओरियंट’ कंपनीने पूर्ण करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी या कामाची कंपनी बदलण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अर्धवट रस्त्यावरून जीवघेणी वाहतूक

गुजरातमधील हजिरा ते कोलकातापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा देशातील प्रमुख महामार्गापैकी एक. या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. मार्गावरील अमरावती ते नवापूपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गत काही महिन्यांमध्ये अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली. अर्धवट खोदकाम झालेल्या रस्त्यावरूनच अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाची जीवघेणी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणुकांच्या तोंडावर भाजपची धडपड आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना काम दाखविण्यासाठी भाजपने धडपड सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, वाशीम, बुलढाणा व हिंगोली जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात बठक घेण्यात आली. यामध्ये अकोल्यातील दोन उड्डाणपूलासह रस्त्यांची कामे मार्गी लावू, असे सांगण्यात आले. वास्तविक पाहता या कामांचेही भूमिपूजन ३१ ऑक्टोबर २०१५ गडकरींच्या हस्ते करण्यात आले. तीन वर्षांत काहीही झाले नसतांना आता तीन महिन्यात काय होणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम ‘आयएलएफएस’ कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे प्रभावित झाले. त्यावर तोडगा काढण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. या कामाची कंपनी बदलण्याची शक्यता असून, तो प्रयत्न यशस्वी झाल्यास येत्या १५ दिवस ते महिन्याभरात कामाला पुन्हा सुरूवात होईल.

– संजय धोत्रे, खासदार, अकोला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:45 am

Web Title: due to the problem of ilfs obstruct the widening of the highway
Next Stories
1 रायगडमध्ये रासायनिक प्रकल्पांचा धोका कायम
2 दुसरा विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या भावी डॉक्टरचा विवाह सोहळा रद्द
3 प्रिया दत्त यांचा मतदारसंघ मिळवण्यासाठी कृपाशंकर, नगमा यांची मोर्चेबांधणी
Just Now!
X