हवामानावर आधारित पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी पेरणी प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत शेतकऱ्यांना दि. ३० जूनपर्यंत सहभागी होता येईल, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खरीप हंगामात यंदा राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत पथदर्शक स्वरूपात ही योजना सुरू करण्यात आली आहे. हवामानावर आधारित पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. ३० जूनपर्यंतची मुदत आहे. मात्र यंदा पावसाअभावी तोपर्यंत पेरणी झाली नसेल तरीही विमा हप्ता भरता येईल, असे सांगून विखे म्हणाले, शेतकऱ्यांनी पीकपेरणीचे हमीपत्र देऊन नंतर सदर पिकाची पेरणी करणे अनिवार्य आहे.
राज्यातील सहा महसूल विभागांतील एकूण १२ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हवामानावर आधारित पीकविमा योजना विविध प्रकारच्या ७ पिकांसाठी सुरू करण्यात आली. यामध्ये नगर जिल्ह्याचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यत मूग, उडीद, कापूस, बाजरी या पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. प्रत्येक महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत पावसाच्या नोंदीनुसार विमा रक्कम देय राहील. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपातील असल्याचेही विखे यांनी सांगितले.