निवडणूक कर्मचा-यांना मतदानाच्या दिवशी दिले जाणारे जेवण व मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी दिल्या जाणा-या साहित्याच्या दर्जाबद्दल कर्मचारी आतापासूनच चिंतेत आहेत.
लोकसभेच्या मतदानाला आता चारच दिवस राहिले असून निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांना आत्ताच हे वेध लागले आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशीच सर्व साहित्य घेऊन कर्मचा-यांना त्यांना देण्यात आलेले मतदान केंद्र गाठावे लागते. हा मुक्कामच त्यांचा मतदान केंद्रावर होतो. यात त्यांना किमान दोन जेवणं, नाश्ता द्यावा लागतो. आदल्या दिवशीच्या रात्रीचे जेवण बहुसंख्य कर्मचारी घरून आणलेल्या डब्यातच करतात, मात्र मतदानाच्या दिवशी त्यांना सरकारी यंत्रणेकडून मिळणा-या नाश्ता व जेवणाच्या पाकिटावरच अवलंबून राहावे लागते.   
जिल्ह्य़ातील अनेक गावे दुर्गम किंवा अडचणीच्या ठिकाणी आहेत. असंख्य गावांमध्ये वीज, स्वच्छतागृहे यापासून अनेक अडचणी असतात. कर्मचा-यांना जेवणाची पाकिटे दिली जातात. ती तेथेच पोहोच केली जातात. ब-याचदा त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो अशी कर्मचा-यांची तक्रार आहे. तेलकट भाज्या, वाळून गेलेल्या पु-या अशा पद्धतीचे हे जेवण असते असे काही कर्मचा-यांनी सांगितले. ब-याचदा या पु-या दोन दिवस आधीच तयार केलेल्या असतात अशीही माहिती मिळाली आहे. या पूर्वानुभवावरूनच यंदा कर्मचारी चांगल्या जेवणाबद्दल चिंतेत आहेत.
याशिवाय मतदानासाठी आवश्यक असणारे साहित्यही ब-याचदा निकृष्ट दर्जाचे असते. पेन, खोडरबर, पेन्सिल, दोरा, सील करण्यासाठी लागणारे शिसे, मार्कर पेन व सर्वात महत्त्वाची मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई या सर्वांचा दर्जा अतिशय सुमार असतो, यामुळे अनेक कर्मचारी नेहमीच शक्य तेवढे साहित्य स्वत:चे वापरतात, त्यासाठी काही भुर्दंडही सोसतात असेही सांगण्यात येते.