News Flash

कोयना धरणातून होणारी वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद

धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे कोयना धरण जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्राची वीजवाहिनी मानल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती आजपासून पूर्णपणे बंद झाली आहे. कोयना धरणात केवळ १६.५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून त्यातील ५ टीएमसी हा मृतपाणीसाठा आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे कोयना धरण जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोयना धरणाच्या चौथ्या टप्प्यातून निर्माण होणारी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. परिणामी राज्याला काही प्रमाणात भारनियमनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

१०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणाच्या एकूण चार टप्पे आणि पायथा वीजगृहातून एकूण दोन हजार मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती केली जाते. पाणी वाटप लवादानुसार १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षात धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ६७.२५ टीएमसी इतक्या पाण्यावर ही वीजनिर्मिती केली जाते. मात्र चालू तांत्रिक वर्षात धरणातील वीजनिर्मितीचा पाणीकोठा संपुष्ठात येत असतानाच धरणातील उपलब्ध पाणीसाठा देखील संपुष्ठात येण्याची दुर्दैवी वेळ आल्याने कोणत्याही क्षणी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे कोयनेच्या चौथ्या टप्प्यातून निर्माण होणारी वीजनिर्मिती बंद पडण्याची श्यक्यता निर्माण झाली होती.

राज्य शासनाने राज्यातील दुष्काळजन्य आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाळा सुरु होईपर्यंत राखीव पाणी कोटा शिल्लक ठेवून कोयनेतून निर्माण होणारी वीजनिर्मिती बंद करून राज्यातील सिंचनाला अधिक प्राधान्य देणारा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी घेतल्याने कोयनेच्या चौथ्या टप्प्यातून निर्माण होणारी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात योणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान कोयना धरणाच्या टप्पा क्रमांक १, २ आणि ३ मधून एकूण ९२०  मेगावॅट वीज कमी क्षमतेने सुरु असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे अगोदरच दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या महाराष्ट्राला ऐन उन्हाळ्यात पुन्हा भारनियमनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोयना सिंचन मंडळाने यापूर्वीच कोयना धरणात पुढील तांत्रिक वर्षासाठी तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवला होता. त्यामुळे पुढील वर्षात  धरणात जोपर्यंत पाण्याची आवक सुरु होई पर्यंत महाजनको यांच्या उर्वरित ,३.८३ टीएमसी पाणीसाठ्यातून केवळ चिपळूण शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी (पावसाच्या पाण्याची आवक सुरू होईपर्यत) दररोज ०.०५ टीएमसी पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाकडून महाजनको यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्या मुख्य अभियंता वैशाली नारकर यांनी दिली. पूर्वेकडे सिंचनासाठी कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २२हजार १०० क्युसेक आणि धरणाच्या रिव्हर स्लुईस (विमोचक) दरवाजातून १ हजार क्युसेक असे एकूण ३ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग अद्याप सुरूच असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 1:39 am

Web Title: electricity from koyna dam stopped due to water scarcity
Next Stories
1 स्थलांतरित मजूर ते खासदार.. श्रुंगारे यांचा जिद्दीचा प्रवास
2 रावसाहेब दानवे यांची चढती कमान
3 १५ वर्षांनंतर पश्चिम विदर्भाला मंत्रिमंडळात संधी
Just Now!
X