राज्यातील विजेचे दर व दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत आता फेरविचार करावाच लागेल, असे परखड मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी नागपुरात व्यक्त केले. यावरून राज्यातील वीजपुरवठय़ाची स्थिती गंभीर असल्याचेच संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विजेच्या दराचा पुनर्विचार केला जाणार आहे काय, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात कमी दरात वीज दिली जाते. एकूण साडेदहा हजार कोटी रुपयांची सवलत विजेच्या दरात दिली जात आहे. परिणामी राज्यात विजेचा दर जास्त आहे, हे मान्य करावे लागेल, पण राज्यात २४ बाय ७ वीजपुरवठा केला जातो, हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. शेजारील एक-दोन राज्यांतच विजेचा दर कमी असून सौर ऊर्जेचा पर्याय आता स्वीकारण्याची वेळ आली आहे. परळी वीज केंद्र बंद पडले आहे, गॅसअभावी दाभोळ प्रकल्प बंद आहे. मोठय़ा प्रमाणात पेट्रोलियम तेल आयात करावे लागत आहे. अशा परिस्थितीतपण आता विजेचा दर व सवलतींबाबत सारासार विचार करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 4:31 am