पीएनपी एज्युकेशनच्या प्रभाविष्कार सोहळ्याच्या समारोपाला ‘होम मिनिस्टरचे’ आदेश बांदेकर यांची उपस्थिती लाभल्याने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. पीएनपी एज्युकेशन गेटपासून ते व्यासपीठापर्यंत त्यांचे भव्य दिव्य स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने केले.
दिनांक १५ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये प्रभाविष्कार सोहळा साजरा करण्यात आला होता. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रम राबविण्यात आले होते. दिनांक २३ डिसेंबर रोजी या प्रभाविष्काराचा समारोप करण्यात आला, त्या वेळी ‘होम मिनिस्टरचे’ आदेश बांदेकर व ‘दिल्या घरी सुखी राहा’ या सीरियलची अभिनेत्री वृंदा (भक्ती देशपांडे) उपस्थित होते. या वेळी पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, प्रशासन अधिकारी सु. ना. कुलकर्णी, प्राध्यापक नीलेश मगर व प्राध्यापक,  विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या समारोपाच्या वेळी आदेश बांदेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, घर, गाव, जिल्हा, शहर, महाविद्यालय आपल्यासाठी काय करते यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करतो हे महत्त्वाचे आहे. अलिबागचा विकास चांगल्या प्रकारे होऊ लागला असून पीएनपीसारख्या शिक्षण संस्था खेडोपाडय़ातील मुलांना एक चांगले व्यासपीठ व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांचे कौतुक करावेसे वाटते. ही संस्था अलिबागमध्ये उभारली याचा मला अभिमान आहे. कारण मी अलिबागचा आहे व अलिबाग माझा आहे हे मी ठामपणे बोलू शकतो, असे ते म्हणाले. त्याचबरोबर ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या सीरियलच्या अभिनेत्री भक्ती देशपांडे यांनी सांगितले की, मला आज येथे आल्यावर खूपच आनंद झाला आहे. कारण इतक्या आपुलकीने प्रेमाने स्वागत केले, त्या वेळी माझे मन भरून गेले.