पतीला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याकडून आपल्या जीवालाही धोका असल्याचा खळबळजनक आरोप आत्महत्याग्रस्त शेतकरी दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदना ढवळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी उस्मानाबादच्या सत्र न्यायालयात तसे शपथपत्र दाखल केले आहे.

शपथपत्रात वंदना ढवळे म्हणतात, आपले पती दिलीप ढवळे यांना आत्महत्त्येस भाग पाडणारे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे साक्षीदारांवर दबाव आणून ते पुरावा नष्ट करू शकतात. लहान मुलांसह आपण एकटे राहत असल्यामुळे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि अन्य आरोपींपासून आपल्या जीवितास धोका आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे यांनी १२ एप्रिल रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. तत्पूर्वी ओम राजेनिंबाळकर, विजयकुमार दंडनाईक, तेरणा कारखाना, जयलक्ष्मी कारखाना आणि वसंतदादा सहकारी बँक यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्यावर आत्महत्येची वेळ आली असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. याप्रकरणी ढवळे यांच्या चिठ्ठीतील हस्ताक्षराचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर ढोकी पोलीस ठाण्यात खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह ५२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा याकरीता राजेनिंबाळकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, या अटकपूर्व जामीन अर्जावर आक्षेप घेत वंदना ढवळे यांनी दोन पानी शपथपत्र न्यायालयास सादर केले. यात खासदार राजेनिंबाळकर आणि अन्य आरोपींनी आपसात संगणमत करून कटकारस्थानाने आपल्या पतीची फसवणूक केली. शेतीच्या लिलावाची नोटीस देवून मानहानी केली आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास राजकीय दबाव वापरून ते पुरावा नष्ट करतील. तसेच त्यांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. याप्रकरणी सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.