पूर्व विदर्भात १० हजार ८९८ जागा रिक्त
नागपूर विभागातील ५६ अभियांत्रिकी महाविद्यालयात २५ हजार ६७० जागांपैकी यावर्षी १० हजार ८९८ जागा रिक्त आहेत. अभियांत्रिकीला विद्यार्थी मिळत नसल्यामुळे बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडण्याच्या स्थितीत आहेत, तर विद्यार्थ्यांअभावी अभियांत्रिकी महाविद्यालय चालवायचे तरी कसे, हा प्रश्न संस्थाध्यक्षांना पडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा नारा देत स्किल डेव्हलपमेंटला प्राधान्य दिले आहे. हाच नारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन महाराष्ट्र’, ‘मेक इन विदर्भा’साठी देत स्किल डेव्हलपमेंट व उद्योग विकासाला गती देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. स्किल डेव्हलपमेंट अतिशय प्रभावीपणे राबविण्यासाठी अतिशय हुशार अभियंत्यांची गरज आहे. मात्र, राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. एकटय़ा नागपूर विभागाचा विचार केला, तर ५६ अभियांत्रिकी महाविद्यालये असून यात २५ हजार ६७० जागा आहेत. यात सर्व अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मात्र, यावर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाला इतके वाईट दिवस आले आहेत की, २५ हजार ६७० जागांपैेकी केवळ १४ हजार ७७० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून उर्वरीत १० हजार ८९८ जागा रिक्त आहेत. आता ही प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर्षी सुमारे ११ हजार जागा रिक्त राहणार असल्याने नागपूर विभागातील बहुसंख्य अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होण्याची स्थिती आहेत. अशा महाविद्यालयांमध्ये फक्त दहा ते बारा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत. अशा स्थितीत संस्थाध्यक्षांना ही महाविद्यालये चालविणे कठीण झाले आहे.
एखादे महाविद्यालय चालवायचे म्हटले तर प्राचार्याला २ लाख रुपये महिना पगार द्यावा लागतो. त्याचप्रमाणे प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांना किमान १ ते सव्वा लाख पगार द्यावा लागतो. कॉलेज एकदमच गरीब असेल, तर मग किमान ५० ते ६० हजार रुपये तरी पगार द्यावा लागतो. मात्र, अभियांत्रिकीला विद्यार्थी मिळत नसल्यामुळे प्राचार्य व प्राध्यापकांना इतके मोठे पगार द्यायचे तरी कसे, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. त्यामुळे नागपूर विभागात बहुतांश संस्थांनी ही महाविद्यालये विकण्यासही काढली आहेत. एकटय़ा नागपूरचा विचार केला, तर सुमारे २२ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. दुसरीकडे, विद्यार्थी कमी आणि महाविद्यालयांची संख्या अधिक, अशीही स्थिती काही ठिकाणी आहे. स्पध्रेच्या युगात विद्यार्थी, पुणे, मुंबई, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, चंदिगड, अशा मोठय़ा शहरातील नामांकीत महाविद्यालयात प्रवेश घेत असल्याने व विदर्भात प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थांची अभियांत्रिकी महाविद्यालये असतांनाही ११ हजार जागा रिक्त राहतात. सध्या तरी विदर्भातील या महाविद्यालयांची अवस्था विद्यार्थ्यांअभावी अतिशय वाईट आहे.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ातही निम्म्या जागा रिक्त
चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्ह्य़ांसाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठात पाच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षांच्या १७६० जागा आहेत. यापैकी बऱ्याच जागा रिक्त आहेत. पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये राजीव गांधी अभियांत्रिकी, बल्लारपूर टेक्निकल इंस्टिटय़ूट, श्री साई अभियंत्रिकी, नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोडले तर बहुतांश महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या निम्मे जागा रिक्त आहेत.