आठवडय़ापासून बेपत्ता असलेल्या निफाड तालुक्यातील ओझर येथील अभियांत्रिकीच्या विपीन बाफना (२२) या विद्यार्थ्यांचा अखेर शुक्रवारी मृतदेह आढळून आला. एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ओझर येथील धान्य व्यापारी गुलाबसिंग बाफना यांचा मुलगा विपीन हा भुजबळ नॉलेज सिटीत अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेत होता. पदविकेतील दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याला नाशिक येथील अशोक स्तंभावर खासगी शिकवणी लावण्यात आली होती. ८ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याचे काका सुनील बाफना यांनी त्याला शिकवणीसाठी पंचवटी कारंजावर सोडले. विपीनच्या शिकवणीची वेळ सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत होती. विपीनला घरी येण्यासाठी उशीर झाल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रात्री ११ वाजता विपीनशी मोबाइलवरून संपर्क झाल्यानंतर उशीर झाल्याने देशमुख नावाच्या मित्राच्या घरी झोपणार असून सकाळी घरी येऊ, असा निरोप त्याने दिला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ११ वाजून १८ मिनिटांनी विपीनच्या मोबाइलवरून त्याचे वडील गुलाबसिंग बाफना यांना एक फोन आला. फोनवरून विपीन आमच्या ताब्यात असून त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत पैसे न दिल्यास विपीनला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर विपीनच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधल्यानंतरही कोणताच उपयोग न झाल्याने घाबरलेल्या बाफना यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत विपीन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सर्वत्र शोध मोहीम राबविली, परंतु विपीनचा कोणताच ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी आडगाव ते विंचूरगवळी रस्त्यावरील एका शेतात एका युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. या शेतावर राजेंद्र साळुंके यांची मालकी आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह विपीन बाफनाच असल्याचे आढळून आले. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारल्याच्या जखमा दिसून आल्या. या परिसरात फारसा कोणाचा वावर नाही. शेतातील एका छोटय़ा खोलीत बिपीनला डांबून ठेवण्यात आले असावे व बेदम मारहाण करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या खोलीपासून काही अंतरावर हा मृतदेह आढळून आला. संशयित बाहेर गेल्याची संधी साधून विपीनने खोलीबाहेर येत पळण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु अती मारहाणीमुळे तो कोसळला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.