राममंदिर प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहायला हवी. हा मुद्दा निवडणुकीचा नाही. मात्र, येत्या काळात किमान सहमती बनविण्यासाठी तरी समान नागरी कायद्यावर चर्चा करण्याची गरज असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.  लाडसावंगी ते भाकरवाडी प्रवासा दरम्यान राजनाथ सिंह यांनी विविध प्रश्नांवर मते व्यक्त केली.
आगामी निवडणुकीत देशात एनडीएची सत्ता आल्यास नदी जोड प्रकल्पाला चालना देणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, वाजपेयी यांच्या काळात नदीजोड प्रकल्पाची कल्पना मांडण्यात आली होती. प्रकल्पाचा खर्च आता वाढणार असला तरी निधीची कमतरता भासणार नाही. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण करोडो रूपये खर्च करतो. या प्रकल्पावर खर्च केल्यास दुष्काळाच्या समस्येवर कायमचा तोडगा निघू शकेल.
देशभरातील दुष्काळाबाबत व शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक आठवड्याचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करून ते म्हणाले की, दुष्काळावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता असून माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच कृषी क्षेत्रात देश अग्रेसर होण्यासाठी विशेष धोरणाची गरज आहे. मध्य प्रदेश सारख्या भाजपशासीत राज्यात कृषी विकासाचा दर एकोणीस टक्के असताना महाराष्ट्रात मात्र तो उणे आहे. राज्य सरकारची काम करण्याची इच्छाशक्तीच नाही असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टिका केली.  भाजपशासीत राज्यात मात्र दुष्काळी परिस्थिती असताना तेथील राज्य सरकार चांगल्या प्रकारे काम करत असून शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.   पक्षाच्या जोरावर एखादा माणूस मोठा होतो आणि तो पक्षातून बाहेर पडतो. कर्नाटकचे उदाहरण समोर घेता या घटनांकडे कसे पाहता, असे विचारले असता ते म्हणाले, संघटनेपेक्षा कोणीही मोठा नसतो.
सोमय्या यांच्यावर लवकरच नवी जबाबदारी
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘महाराष्ट्र’ कुपोषित का, असे विचारले असता राजनाथ सिंह म्हणाले, की एकूण देशाचा विचार करता कार्यकारिणीत सर्वाना सामावून घेतले आहे. या वेळी कोषाध्यक्ष महाराष्ट्राचे आहेत. तसेच पूनम महाजन यांचाही समावेश कार्यकारिणीत आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात सतत आवाज उठविणारे किरीट सोमय्या यांना मात्र कार्यकारिणीत स्थान नाही, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, त्यांना नवी जबाबदारी दिली जाईल.
मोदी पक्षासाठी सौभाग्यच
देशातल्या प्रत्येक राज्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आहे. मी अशा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, की ज्याच्या एका नेत्याची राष्ट्रीय स्तरावर मोठी लोकप्रियता आहे. एका अर्थाने हे सौभाग्यच आहे. पंतप्रधान पदासाठीचे ते उमेदवार असतील काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपची एक निश्चित प्रणाली आहे. असे निर्णय एकत्रित चर्चा करून घेतले जातात.
प्रदेशाध्यक्षाची निवड येत्या आठवडाभरात
तेरा-चौदा राज्यांतील प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात आल्या. महाराष्ट्राचे आकलन व स्थिती समजून घेण्यासाठी काही वेळ लागला. मात्र, येत्या आठवडाभरात प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.