ज्येष्ठांच्या प्रयत्नाने गटतट संपुष्टात

वाडा : वाडा तालुक्यातील नेहरोली हा १८५० लोकवस्ती असलेला गाव  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या २० वर्षांनंतर प्रथमच एकसंध झाल्याचे पाहण्यास मिळाले.    यामुळे गावात मतदानात उत्साहही पाहावयास मिळाला. गावातील ज्येष्ठ मंडळीने एकत्र येण्यासाठी केलेला प्रयत्न यामुळे हे सर्व जमून आले आणि यंदा  गावातून एकच उमेदवार देण्याची किमया साधली गेली.

२० वर्षांपूर्वी झालेल्या  ग्रामपंचायत निवडणुकीत नेहरोली या गावात प्रथम वादाची ठिणगी पडली. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी यासाठी अनेकांचा प्रयत्न होता. त्यासाठी गावात दोन गट पडले. हा वाद इतका विकोपाला गेला की, कोणी कोणाच्या  सुख-दु:खाच्या कार्यक्रमातही जात नव्हते.  ग्रामपंचायत निवडणूक आली की  गावातील वाद नेहमीच उफाळून येत असत. या वादात गावात दोनाचे तीन गट झाले. त्यामुळे  गावातील विकासाची सर्व कामे खोळंबली. गावाच्या कार्यक्षेत्रात असलेले काही उद्योगधंदे (कारखाने) गावातील वादाला कंटाळून निघून गेले.

१५ दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुकीतही गावात मोठा वादंग होणार आणि गावाच्या विकासाला खीळ बसणार हे गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी ओळखले. त्यांनी  सर्वाना एकत्र एकत्र आणून परिवर्तन हे परिवर्तन घडविले.  अखेर सर्व गटतटांनी एकत्र येऊन पंचायत समितीवर गावातील एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणू असा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने गावाचा विकास करायचे ठरविले गेले.

नेहरोली गावचे माजी उपसरपंच अमोल पाटील यांच्या रूपाने केवळ एकच उमेदवार देण्यात आला.  या पंचायत समितीच्या गणात अन्यही सात गावे आहेत.  गावात मतदान उत्साहात झाले असले तरी अमोल पाटील यांना त्यांच्या गावात किती मताधिक्य मिळते यावरूनच पाटील यांचे भवितव्य अवलंबून असले तरी निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, गाव एकसंध झाल्याचा आनंद आणि समाधानाचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व गावकरी मतभेद विसरून एकत्र आले हा आनंद मोठा आहे.

-सुरेश पाटील, ग्रामस्थ, नेहरोली