08 August 2020

News Flash

पर्यटनस्थळाचे अस्तित्व धोक्यात

काही वर्षांपासून दूर डोंगरात होणारे बॉक्साईटचे उत्खनन आता गावाच्या कडेला येऊन पोहोचले आहे.

बॉक्साईट उत्खननाचे काम स्थानिकांनी रोखले

एकेकाळी राज्य सरकारने पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश केलेल्या पेण तालुक्यातील महलमिरा डोंगरात बिनबोभाटपणे बॉक्साईटचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे या परिसरातील सात ते आठ वाडय़ांच्या आरोग्याचा आणि रोजच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासकीय यंत्रणेचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त  ग्रामस्थांनी बॉक्साईट खाणींवर धडक देऊन काम बंद पाडले.

महलमिरा डोंगर हे पेण तालुक्याातील थंड हवेचे ठिकाण. मिनी माथेरान अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. या डोंगरावर श्री व्याघ्रेश्वराचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात परिसरातील हजारो भाविक त्याच्या दर्शनासाठी येत असतात. इथला निसर्ग आणि व्याघ्रेश्वराची महती लक्षात घेऊन शासनाने महलमिरा डोंगराचा पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश केला. पुढे तो प्रस्ताव लालफितीत अडकला. मात्र सध्या बॉक्साईटसाठी या डोंगराचे लचके तोडले जात आहेत. त्याचा त्रास येथील चांदेपट्टी, वेताळपट्टी, पाचगणी, बंगालवाडी, बांधणी, दिवाणमाळ, आसानी, भोंगाणी, सायमाळ या वस्त्यांना सहन करावा लागतो आहे.

मागील काही वर्षांपासून दूर डोंगरात होणारे बॉक्साईटचे उत्खनन आता गावाच्या कडेला येऊन पोहोचले आहे. उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या सुरुंग स्फोटामुळे वाडय़ांमधील घरांना हादरे बसताहेत. गावात कोणतीही पिण्याच्या पाण्याची योजना नाही. नसíगक मुबलक पाणी इथे उपलब्ध होते, मात्र स्फोटांमुळे पाण्याने आपले प्रवाह बदलले आणि नसíगक स्रोत कोरडे पडले. पाण्याचे साठेदेखील धुळीमुळे दूषित झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

निसर्गसंपन्न असलेल्या महलमिरा डोंगरावरील झाडे बॉक्साईट उत्खननासाठी तोडण्यात आली आहेत. त्यामुळे एकेकाळी हिरवागार दिसणारा हा परिसर आता उघडाबोडका दिसतो.  या एकूणच परिस्थितीमुळे या आठ वाडय़ांमधील नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.

शासनदरबारी अनेकदा अर्ज विनंत्या करूनही त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बॉक्साईटच्या खाणींवरच धडक देऊन उत्खनन बंद पाडले. गावातील शेकडो नागरिक, महिला आपल्या मुलाबाळांसह यात सहभागी झाले होते.  इथे आमच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला, परंतु सरकार किंवा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते आहे. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. सरकारने आमच्या भावना लक्षात घेऊन जर बॉक्साईटचे उत्खनन थांबवले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 2:54 am

Web Title: existence of tourist place are in danger situation
Next Stories
1 ‘निर्णय घेताना सदसद्विवेकबुद्धी वापरा’
2 भटकणाऱ्या गरीब मुलामुलींना शिक्षणसंधी देणाऱ्या उपक्रमाचा गौरव
3 उद्याचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून खंडग्रास दिसणार
Just Now!
X