शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या स्मारकाबरोबर महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाचा प्रश्न सोडवा अशी विनंती माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. जनभावनेचा आदर राखून राज्य सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे रायगड जिल्ह्य़ातील खाणाव इथे भव्य स्मारक उभारले जाणार होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ एप्रिल २०११ रोजी स्मारकाचा भूमिपूजन समारंभ झाला होता. मात्र त्यानंतर या स्मारकाला काही लोकांनी विरोध केला होता. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र या स्मारकाला स्थानिकांचा विरोध नाही. बहुतांश ग्रामसभांनी तसे ठराव केले असल्याचे मधुकर ठाकूर यांनी सांगितले. लोकभावनेचा आदर राखून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी निरूपणाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे मोठे कार्य केले आहे. सुसंकृत समाजाचा पाया रोवण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे राज्य सरकारकडून न्यायालयात स्मारकासाठी सकारात्मक बाजू मांडली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.