भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी चांगलीच विकोपाला गेली आहे. या वादातूनच पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी खासदार दिलीप गांधी यांच्या गटाच्या पाच प्रमुख पदाधिका-यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करून त्यांना जोरदार धक्का दिला आहे. या पाच जणांच्या जागी लगेचच नवे पदाधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी सचिन पारखी यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या पाच प्रमुख पदाधिका-यांमध्ये गांधी यांचे चिरंजीव तथा नगरसेवक व भाजयुमोचे शहराध्यक्ष सुवेंद्र गांधी यांचाही समावेश आहे. अन्य गांधी समर्थकांमध्ये शहर जिल्हा उपाध्यक्ष मनेष साठे व अनिल गट्टाणी, शहर जिल्हा चिटणीस किशोर बोरा व प्रशांत मुथा यांचा समावेश आहे. या पाच जणांच्या जागी भैया गंधे व जगन्नाथ निंबाळकर (दोघेही शहर जिल्हा उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड व उदय अनभुले (दोघेही शहर जिल्हा चिटणीस) आणि भाजयुमोच्या शहराध्यक्षपदी प्रवीण ढोणे यांची नियुक्तीही आगरकर यांनी जाहीर केली आहे. यातील जगन्नाथ निंबाळकर (दक्षिण नगर), सचिन पारखी (मध्य नगर), भैया गंधे (उत्तर नगर) व अशोक नामदे (भिंगार) यांच्यावर विभागनिहाय मतदार नोंदणीचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरात १ लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट गाठू असा विश्वास आगरकर यांनी या निवडी जाहीर करतानाच व्यक्त केला आहे.
भाजपमध्ये शहरातली गटबाजीला आता व्यक्तिगत शत्रुत्वाचे स्वरूप आले असून यात आगरकर गटही आक्रमक झाला आहे. गांधी समर्थक पदाधिका-यांची थेट हकालपट्टी हे त्याचेच द्योतक मानले जाते. यातील गट्टाणी व साठे यांनी अलीकडेच पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून आगरकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. या मागणीने पक्षात खळबळ तर उडालीच, मात्र या गटबाजीला वेगळे वळणही लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गांधी-आगरकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
गांधी गटाच्या पाच पदाधिका-यांची हकालपट्टी करताना आगरकर यांनी त्यांच्यावर पक्षशिस्तीचा ठपका ठेवला आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की काही पदाधिका-यांकडून पक्षाच्या संघटनात्मक बाबींचा गेल्या काही दिवसांपासून जाहीर ऊहापोह सुरू आहे. पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेतही जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत. शहरात पक्षाची भक्कम ताकद असून त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला शहरात ४० हजार मते मिळाली. मात्र काही पदाधिका-यांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळेच हे संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत, असे आगरकर यांनी म्हटले आहे.
वेळ आल्यावर बोलू!
याबाबत खासदार दिलीप गांधी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर काही बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, माझ्यामध्ये भरपूर संयम आहे. त्यामुळेच राजकारणात मी टिकून आहे. याबाबत तूर्त काही बोलणार नाही, वेळ आल्यावर जरूर बोलू, असे ते म्हणाले.