माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सोशल नेटवर्किंग साइट्सचे महत्त्व झपाटय़ाने वाढते आहे. फेसबुक, ऑरकूट, ट्विटर यांसारख्या साइट्सचा वापर करणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. दूर असलेले जग या माध्यमातून जवळ येत आहे. विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून केली जाते आहे. फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर परखड मते मांडली जात आहेत. त्यामुळे आगामी काळात साहित्याचा एक अविभाज्य घटक म्हणूनही सोशल नेटवर्किंग साइट्सकडे पाहिले जाते आहे. हीच बाब लक्षात घेऊन अलिबाग इथे सुरू असलेल्या चौथ्या शब्द साहित्य संमेलनात फेसबुक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील फेसबुककार यात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
औरंगाबादहून आलेल्या रंजना कंधारकर या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर चित्रलेखा पाटील फेसबुक संमेलनाच्या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. फेसबुक हे भावना व्यक्त करणारे, एकमेकांत जिव्हाळा निर्माण करणारे माध्यम असल्याचे रंजना कंधारकर यांनी सांगितले. शब्दांमध्ये ऊर्जा देण्याचे सामथ्र्य आहे. ही ऊर्जा आणि हे शब्द एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सामथ्र्य फेसबुकमध्ये असल्याचे त्यांनी या वेळी व्यक्त केले. फेसबुकमध्ये अध्यात्म आहे, साहित्य आहे, काव्य आहे, अश्लीलता आहे, प्रलोभन आहे, मात्र यातून तुम्हाला काय घ्यायचे आहे हे लोकांनी ठरवायचे असल्याचे कंधारकर यांनी या वेळी व्यक्त केले.    फेसबुकचा गैरवापर करून अलीकडच्या काही अपप्रवृत्ती बळावत असल्याचे आक्षेप या वेळी घेण्यात आले. मात्र अशा अपप्रवृत्तींना वेळीच रोखणे सहज शक्य आहे. त्यांचे कौन्सलिंग करण्याची गरज असल्याचे कंधारकर यांनी या वेळी व्यक्त केले. या परिसंवादात जोत्स्ना रजपूत, वर्षां चौगुले, स्मिता गांधी यांनी फेसबुकबद्दलची आपली मते व्यक्त केली. चित्रलेखा पाटील यांनी शब्द साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कवी, लेखक, साहित्यिकांना एकत्र आणल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.