हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : तारापूरमधील प्रदूषणकारी कारखान्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नोटीस बजावली आहे. रासायनिक घातक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. मात्र रासायनिक सांडपाणी खुलेआम नैसर्गिक नाल्यामध्ये सोडल्याचे उघड झाले असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष करत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लांट नं- ई ६२/६३ या बजाज हेल्थ के अर लि. कारखान्यातून बाहेर असलेल्या नाल्यात व औद्योगिक क्षेत्राचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडले जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बजाज हेल्थ केअर कारखान्याला नोटीस बजावून तीन दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लांट नंबर एल-११ ही पूर्वी न्यूट्रॉप्लस व आताची बजाज हेल्थ केअर च्या नावे असलेल्या कारखान्यातून बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास  वाहनातून कारखान्यातील साठवणूक करून ठेवलेला रासायनिक घनकचरा बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर  वाहनातून देखील घनकचरा भरून बाहेर काढण्यात आले. बोईसर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बेटेगाव चौकीवर वाहन चौकशीसाठी थांबविण्यात आले. कारखानदाराने खोटी कागदपत्रे सादर केल्यानंतर थांबवलेली मालवाहू वाहणे बोईसर पोलिसांनी सोडून दिली होती.

औद्योगिक क्षेत्रातील याअगोदर बंद असलेल्या प्लांट नं एल ११ या कारखान्यात मोठय़ा प्रमाणात रासायनिक घनकचरा साठवून करून ठेवला होता. कारखानदारांने आपल्या इतर कारखान्यांची कागदपत्रे दाखवून चोरटय़ा पद्धतीने कारखान्यातील रासायनिक घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या वाहनातुन बाहेर काढण्यात आला होता.  याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी दोन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले होते, मात्र आठवडा उलटून गेला असतानादेखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. याबाबत पुन्हा  संपर्क साधला असता लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.